Nawab Malik: मोठी बातमी: भाजपचा विरोध डावलून अखेर अजित पवारांनी नवाब मलिकांना एबी फॉर्म दिला, पण....
Maharashtra Assembly Election 2024: नवाब मलिक हे मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघातून लढणार आहेत.
मुंबई: अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊदच्या हस्तकाशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांना सोबत घेण्यास आणि आता विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यास भाजपचा स्पष्ट विरोध होता. त्यामुळे अजित पवार गटाकडून अद्याप नवाब मलिक यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, नवाब मलिक यांना अजित पवार गटाने (Ajit Pawar Camp) एबी फॉर्म देऊन ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा एबी फॉर्म उमेदवारी अर्जाला जोडण्याबाबत नवाब मलिक यांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच नवाब मलिक हे आपल्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडतील. अन्यथा मुंबईतील शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यावर नवाब मलिक ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे थोड्याचवेळात नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील की नाही, हे स्पष्ट होईल.
अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली तरी आमचा त्याला विरोध राहील, असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांच्याबाबत आमची भूमिका कायम राहील. पण शेवटी त्यांना उमेदवारी द्यायची की नाही, हा निर्णय त्यांच्या पक्षप्रमुखांचा आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले. तर मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदार संघातून शिंदेच्या शिवसेनेकडून सुरेश (बुलेट) पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरेश (बुलेट) पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला होता.
सुरेश (बुलेट) पाटील हे आज शिवाजीनगर-मानखुर्द या विधानसभेतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे महायुतीमधे असलेले नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार की अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार याकडे लक्ष लागले होते. महायुतीमधे मैत्रीपूर्ण लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अणुशक्ती नगर विधानसभेत सना मलिक यांच्या विरोधात शिवसेनेकडून अविनाश राणे हे उमेदवार देण्यात आले आहेत. सना मलिक या नवाब मलिक यांच्या कन्या आहेत.
आणखी वाचा
भाजपाची चौथी उमेदवार यादी जाहीर, अखेर नरेंद्र मेहतांनी मीरा-भाईंदरमधून बाजी मारलीच