एक्स्प्लोर
मला स्वत: युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे
राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांशी बोलताना शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मुंबई : "मला स्वत: युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा," अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत घेतली. "लोकसभेवेळी जे ठरलंय, ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाहीत," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला आहे. 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत घेतलेली भूमिका आजही कायम ठेवली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील तिढा आणखीच वाढला आहे. परिणामी सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपवरील दबाव आणखीच वाढला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या भेटीत भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना उद्धव ठाकरे यांनी आज 'मातोश्री'वर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांशी बोलताना शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. लोकसभेवेळी जे ठरलंय ते व्हावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. बैठकीत उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले? "आपल्या पक्षाचं निर्माण स्वाभिमानातून झालं आहे.केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळं करत नाही. जे ठरलं असेल तसं असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फोन करावा. मला ठरल्यापेक्षा एकही कण जास्त नको. मला खोटं ठरवायचं असेल तर हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. भाजपला ठरवून बाजूला करायचं असं काही नाही, पण भाजप जर शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करेन. अडीच वर्ष पहिली की नंतरची हा वाद नव्हता, पण जर ठरलंच नाही असं सांगत असतील तर चर्चा काय करायची," असं उद्धव ठाकरे आमदारांच्या बैठकीत म्हणाले. उद्धव ठाकरे चर्चेला तयार उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरुन ते चर्चेला तयार असल्याचं स्पष्ट दिसतं.आम्ही चर्चेला तयार आहोत, शिवसेनेने चर्चेसाठी यावं, असं भाजपच्या नेत्यांनी वारंवार म्हटलं आहे. आता उद्धव ठाकरेही चर्चेसाठी तयार असल्याचं दिसतं. यासाठी पक्षश्रेष्ठींनी फोन करावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आमदार हॉटेलमध्ये, शिवसेनेची खबरदारी बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी हॉटेल रंगशारदा इथे केली आहे. आमदार फुटीच्या भीतीने शिवसेनेने हे पाऊल उचलल्याचं कळतं. सत्ताधाऱ्यांनी गेल्या काही दिवसात सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितलं होतं. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.
आणखी वाचा























