वझे- केळकर महाविद्यालयात ध्रुवा संस्कृत महोत्सव उत्साहात संपन्न, 400 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
मुंबईतील वझे- केळकर महाविद्यालयात ध्रुवा संस्कृत महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यंदा हे महोत्सवाचे दहावे वर्ष होते.यात 400 हून अधिक स्पर्धक सहभागी झालेले.

मुंबई(कुर्ला) : येथील वझे- केळकर महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केला जाणारा ध्रुवा संस्कृत महोत्सव सोमवारी (18 ऑगस्ट 2025) प्रचंड उत्साहात संपन्न झाला. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली यांच्या अष्टादशी प्रकल्पांतर्गत ध्रु्वा संस्कृत महोत्सवास अनुदान प्राप्त झाले. यंदा हे महोत्सवाचे दहावे वर्ष होते.दरवर्षी संस्कृतशी निगडित निरनिराळ्या संकल्पना घेऊन त्यावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. ह्यावर्षी श्रीमद्भगवद्गीता ही संकल्पना घेऊन त्यावर आधारित गायन , नृत्य, नाट्य, विद्वत्परिषद्, गीता अन्त्याक्षरी, प्रश्नमंजुषा, चित्राभिव्यक्ति, छात्रशिक्षक इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये 400 हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शवला. ज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नंदुरबार, वेल्लोर व दिल्ली येथील 15 शाळा आणि 15 महाविद्यालयांमधील विद्यार्थी व शिक्षकांचा समावेश होता.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी संस्कृतकार्यकर्ते डॉ. ए. एस. प्रसाद महोदयांनी उपस्थित राहून 'प्राचीन साहित्यातून प्रेरित होऊन संस्कृत भाषेचा प्रसार' याबद्दल खूप सुंदर व्याख्यान दिले. यावेळी बोलताना प्राचार्या प्राध्यापिका डॉ . प्रीता निलेश यांनी ध्रुवाच्या सर्वेसर्वा अदिती माधवन् यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले. या वर्षीचा छात्रप्रतिनिधी ध्रुव लवाटे याने दशकोत्सवाच्या शुभेच्छा देत ध्रुवाच्या विभागप्रमुखांची ओळख करून दिली. तसेच समारोप समारंभात राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत या संस्थेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे महोदय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील काही तथ्यांच्या आधारे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि संस्कृतनुरागींना मौल्यवान मार्गदर्शन केले.

आश्चर्यकारक बाब म्हणजे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुट्टी जाहीर केलेली असतानाही विविध भागातून आलेले शिक्षक विद्यार्थी स्वेच्छेने समारोपापर्यंत थांबले. दरवर्षीप्रमाणेच भरगच्च भरलेल्या सभागृहात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम भल्या मोठ्या उत्साहात पार पडला यातच या महोत्सवाचे यश दिसून येते.4 गटातून 12 स्पर्धा व इतर विशेष पारितोषिकांचे वितरण झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद अनावर झाला होता.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणसिंग राजपूत यांनी ध्रुवाचमूचे भरभरून कौतुक केले. 16 परीक्षक व स्पर्धक, सहभागी शिक्षक, भेट द्यायला येणारे असे सगळेजण या उत्साहाच्या संस्कृत-वातावरणात चिंब न्हाऊन गेले. अशाप्रकारे ध्रुवा संस्कृत महोत्सवाचे दहावे वर्ष छात्रप्रतिनिधी ध्रुव लवाटे, 7 विभागप्रमुख आणि 40विद्यार्थी अशा या गटामध्ये 11 वी ते पदवीचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी मोठ्या दिमाखात पार पडले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























