दहावीच्या परीक्षेत गणित, विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुण आवश्यक; राज्य मंडळाचं स्पष्टीकरण
SSC Board Exam : फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्णतेचे निकष प्रचलित नियमांप्रमाणेच असणार आहेत.
SSC Board Exam : दहावीच्या परीक्षेत (SSC Exam) गणित, विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुण आवश्यक असल्याचं स्पष्टीकरण राज्य मंडळानं दिलं आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्णतेचे निकष प्रचलित नियमांप्रमाणेच असणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात या नियमात बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयात 35 गुणांपेक्षा कमी आणि 20 गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार असल्याचं आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणइ उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्णतेचे निकष प्रचलित नियमांप्रमाणेच असणार आहेत. ज्या वर्षी निकषांत बदल होतील, त्या वर्षी मंडळाकडून स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्य मंडळाने दिलं आहे.
मराठी वृत्तपत्राशी संवाद साधताना राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील तरतूद केवळ प्रस्तावित आहे. त्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याचं निदर्शनास आल्यानं राज्य मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. येत्या परीक्षेसाठी प्रचलित नियमात कोणताही बदल केलेला नाही. कोणताही बदल करायचा असल्यास त्यापूर्वी शासन मान्यता, शासन निर्णय अशा प्रक्रिया असते.
राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी तिसरी ते बारावी या स्तरासाठीचा राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा अंतिम मसुदा जाहीर केला. या मसुद्याला राज्य सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. या आराखड्यानुसार, शालेय शिक्षणाच्या स्तरावर अनेक बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. आता राज्यात नवं सरकार अस्तित्त्वात आल्यावर राज्य अभ्यासक्रम आराखड्याची पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI