SSC Exam Result : दहावीची पुरवणी परीक्षा कधी होणार? पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी बोर्डानं दिली मोठी अपडेट
Maharashtra SSC Board Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून दहावीच्या पुरवणी परीक्षेबाबत माहिती देण्यात आली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे यांच्याकडून दहावीच्या परीक्षेचा (SSC Exam )निकाल जाहीर करण्यात आला.1 मार्च ते 26 मार्च या दरम्यान दहावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांमधील नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 95.81 इतका लागला आहे. राज्यातील काही विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र ठरले तर काही विद्यार्थी पुनर्परिक्षार्थी ठरले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे, असं मंडळाचे सचिव शरद गोसावी यांनी म्हटलं. पुरवणी परीक्षेबाबत बोर्डाकडून लवकरच अधिकृत सूचना जाहीर केल्या जातील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं आयोजन केलं जातं. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 60 हजार 154 नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी 15 लाख 49 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यानुसार नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.81 इतकी ठरली.
दहावीची पुरवणी परीक्षा कधी होणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 26 हजार 645 विद्यार्थ्यांना एटीकेटीनुसार अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना आगामी पुरवणी परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावं लागेल. अन्यथा त्यांना अकरावी उत्तीर्ण असा निकाल दिला जाणार नाही. दुसरीकडे राज्यातील 65 हजार विद्यार्थी परिक्षार्थी पुरवणी परीक्षेमध्ये पुनर्परिक्षार्थी ठरले आहेत. यामुळं आगामी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली. या पुरवणी परीक्षेच्या नोंदणीबाबत संंबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये अधिक माहिती मिळेल.
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी मंडळानं यापूर्वीच माहिती दिली होती. मंडळानं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ३१ मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी परिपत्रक मंडळाकडून जारी केलं जाणार आहे.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणं यंदा देखील दहावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. विद्यार्थ्यांना आगामी काळात त्यांच्या शाळांमध्ये निकालाची छापील प्रत उपलब्ध होईल.
संबंधित बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI