किनवट तालुक्यातील घोटी जिल्हा परिषदेची शाळा अज्ञातांकडून जेसीबीने जमीनदोस्त, गावात खळबळ
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील घोटी जिल्हा परिषदेची शाळा अज्ञातांनी जेसीबीने जमीनदोस्त केल्याचा प्रकार समोर आला आहे.जिल्हा परिषद विभागाची कोणतीही परवानगी न घेता ही शाळा पाडण्यात आल्याचं समोर आलं आहे.
नांदेड : किनवट तालुक्यातील घोटी गावात शासनाची कोणतीही परवानगी न घेता जिल्हा परिषदेची शाळा जेसीबीने जमीनदोस्त केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. किनवट शहरापासून जवळच असलेल्या मौजे घोटी येथील सुसज्ज रंगरंगोटी केलेली जिल्हा परिषद शाळेची इमारत जेसीबी मशिनद्वारे रातोरात जमीनदोस्त केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सदर जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत रात्रीत जमीनदोस्त करणाऱ्या व्यक्तीची कोणतीही माहिती मात्र ग्रामस्थांना नाहीये. शाळा सकाळी पडलेली दिसल्यानंतर घोटी येथील नागरिक राजू सुरोशे यांनी या घटनेची लेखी तक्रार शिक्षण विभाग नांदेड यांना दिली. या बाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की काल मध्यरात्री जिल्हा परिषद शाळा घोटी ता. किनवट येथील उत्तम दर्जाची इमारत जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडण्यात असली. सदर शाळेची इमारत अज्ञात व्यक्तीने पाडली असून त्याची कोणतीही खबर गावचे सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, पोलीस पाटील यांना देण्यात आली नव्हती त्याचप्रमाणे ही इमारत जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडण्यात आल्याचा अंदाज त्या ठिकाणी असलेल्या टायरच्या खुणांवरून करण्यात आलाय.
या प्रकरणाची चौकशी होणार
या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही व्हावी यासाठी शिक्षण अधिकारी नांदेड यांना लेखी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. या घटनेची माहिती किनवट गटशिक्षणाधिकारी यांना विचारली असता आपणास याविषयी काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या घटने विषयी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी वर्षा ठाकूर यांच्याकडून माहिती घेतली असता सदर जिल्हा परिषद शाळा घोटी पाडण्याविषयी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून कोणतीही कायदेशीर परवानगी देण्यात आली नसल्याची त्यांनी सांगितले.
तसेच याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्षा ठाकूर यांनी गटशिक्षणाधिकारी किनवट यांना तात्काळ आदेश देऊन घोटी येथील जिल्हा परिषद शाळा पाडलेल्या घटनेचा अहवाल देण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. विना परवानगी शाळा पाडणाऱ्या दोषींवर योग्य ती कायदेशीर करू असे आश्वासन त्यांनी दिलंय.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI