Buldhana Crime : तीन महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या स्टेट बँकेच्या मॅनेजरला जीवे मारलं, आरोपी आणि त्याच्या पत्नीला बेड्या
Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यातील हिरवड इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरच्या हत्ये प्रकरणी मेहकर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसंच या गुन्ह्यात आरोपीला मदत केली म्हणून त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Buldhana Crime : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील हिरवड इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) मॅनेजरच्या हत्ये प्रकरणी मेहकर पोलिसांनी (Mehkar Police) आरोपीला अटक केली आहे. तसंच या गुन्ह्यात आरोपीला मदत केली म्हणून त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश देशमाने असं आरोपीचं नाव असून तो एका लॉजचा व्यवस्थापक आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. आरोपी बँक मॅनेजरच्या संपर्कात होता.
थर्टी फर्स्टच्या रात्री बँक मॅनेजरचा गळा चिरुन मृत्यू
लोणार तालुक्यातील हिरवडमधील एसबीआयमध्ये कार्यरत असलेले परिविक्षाधीन शाखा व्यवस्थापक उत्कर्ष पाटील (वय 35 वर्षे) यांची 31 डिसेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. तर 1 जानेवारी रोजी सायंकाळी सारंगपूर शिवारातील एका शेतालगतच्या नाल्यामध्ये त्यांच मृतदेह आढळला होता. यानंतर मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृतदेह आढळलेल्या नाल्यानजीकच्या शेतामध्ये रक्त लागलेले धारदार शस्त्र तसंच मृताचा एक बुट पडलेला दिसला. त्यानंतर यावरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्धल भादंवि कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु आहे.
औरंगाबाद-पुणे महामार्गावरुन आरोपीला अटक, पत्नीलाही बेड्या
उत्कर्ष पाटील हे मुंबईचे रहिवासी होते आणि ते मेहकर इथल्या लॉजमध्ये तात्पुरता राहत होता. तेव्हाच बँक मॅनेजरची लॉजच्या व्यवस्थापकासोबत ओळख झाली होती. या लॉजच्या व्यपस्थापकाने उत्कर्ष पाटील यांची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांना तपासादरम्यान आला. त्यानंतर पोलिसांनी गणेश देशमाने या आरोपीला औरंगाबाद-पुणे महामार्गावरुन काल (4 जानेवारी) सायंकाळी अटक केली. हत्या केल्यानंतर आरोपी आपल्या घरी गेला. रक्ताने माखलेले कपडे मेहकर शहराच्या बाहेर विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या पत्नीनेही मदत केल्याचं तपासात आढळलं. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या पत्नीलाही अटक केली.
हत्येचा उद्देश काय?
दरम्यान केवळ तीनच महिन्यांपूर्वी मुंबईहून हिरवड भागात नोकरीसाठी आलेल्या उत्कर्ष पाटील यांची गणेश देशमाने याने हत्या का केली? त्याचा उद्देश काय होता? हत्या करताना आरोपीला अजून कुणी मदत केली का? याचा तपास करत असल्याची माहिती मेहकर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. शिवाय हा खून थर्टी फर्स्टच्या पार्टीतून झाला की आणखी वेगळ्या कारणाने झाला, यात काही रहस्य दडलेलं आहे का हे आता तपासाअंती स्पष्ट होईल.
VIDEO : Buldhana : बुलढाण्यात स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची हत्या, गळ्यावर चाकूने वार केल्याची माहिती