(Source: Poll of Polls)
Crime News: दुर्दैवी! पतीचा हार्ट अटॅकनं मृत्यू, विरह सहन न झाल्यानं पत्नीनंही उचललं टोकाचं पाऊल
Crime News: शिक्षक पतिच्या निधनानंतर पत्नीने विषारी औषध पिऊन जिवनयात्रा संपवली. या घटनेनंतर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड: बीडमधील शिरूर कासार तालुक्यातील खामकरवाडी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरूर कासार तालुक्यातील खामकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकाचा पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घटनेच्या काही तासातच त्यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून पतीच्या पाठोपाठ आपला जीवन प्रवास थांबवल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खामकरवाडी येथील शिक्षक कन्हैया लाल खामकर वय 52 वर्ष हे तालुक्यातील आर्वी केंद्रांतर्गत असलेल्या शिंदे वस्ती शाळेवर शिक्षक म्हणून कार्य करीत होते. आज सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा शोकात कुटुंब बुडालेलं असतानाच त्यांच्या पत्नी राहीबाई कन्हैयालाल खामकर वय 45 वर्ष यांनी पुढील काही वेळातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह शिरूर येथील शासकीय रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू
निवडणूक कर्तव्यावर जात असताना आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक कर्तव्यावर जात असलेल्या आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. सुमन संतोष यादव असे मृत महिलेचे नाव असून त्या 39 वर्षांच्या होत्या. सुमन यादव या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील 5 वर्षांपासून आशासेविका म्हणून कार्यरत होत्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची ड्युटी काल नागले गावातील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक 1 येथे होती. आज सकाळी सुमारे 6.30 वाजता, त्या नागले गावातील रेल्वे रुळ ओलांडत असताना त्या धावत्या रेल्वेखाली आल्या. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमन यादव यांच्या आकस्मिक निधनाने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
इलेक्शन ड्युटी आटोपून घरी जातांना अपघातात शिक्षकाचे निधन
जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे मतदान ( बी. एल.ओ.) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी परत जात असताना अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी या अत्यंत घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.