Kolhapur News: कोल्हापुरात ऐन दिवाळीत भर रस्त्यात अघोरी प्रकार; आठ ते दहा जणांच्या तरुण टोळक्याची मध्यरात्री फिरून अघोरी पूजा
Kolhpaur News: पहाटे गावकऱ्यांनी इंगळी गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागीच पांढऱ्या फडक्यात ठेवलेलं जनावराचं काळीज, त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचा कट केलेला भाग पाहिला.

Kolhpaur News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावाच्या हद्दीत मध्यरात्री काही तरुणांनी अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मध्यरात्री गावात फिरून अघोरी पूजा केल्याचं उघड
मिळालेल्या माहितीनुसार, आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून अघोरी पूजा केल्याचं उघड झालं आहे. गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तरुण गावात संशयास्पद हालचाली करताना दिसत आहेत. पहाटे गावकऱ्यांनी इंगळी गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागीच पांढऱ्या फडक्यात ठेवलेलं जनावराचं काळीज, त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचा कट केलेला भाग पाहिला. या दृश्याने ग्रामस्थांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्राथमिक तपासात काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार कोणत्यातरी अघोरी पूजेचा भाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
इंगळी परिसरात सातत्याने अघोरी पूजेचा प्रकार
दरम्यान, इंगळी परिसरात काही वर्षांपूर्वी अशाच स्वरूपाची घटना घडली होती. त्या वेळीही गावाच्या बाहेर अघोरी वस्तू आणि प्राण्यांचे अवयव आढळले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, या प्रकारामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे याचा शोध सुरू आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















