Sydney Terrorist Attack: ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला, बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर मृतदेहांचा खच, पाकिस्तानचं कनेक्शनही समोर, नेमकं काय घडलं?
Sydney Terrorist Attack: ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरालगतच्या बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. तर 42 जण जखमी झाले.

Sydney Terrorist Attack: ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरालगतच्या बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. तर 42 जण जखमी झाले. बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि पळापळ सुरु झाली. मात्र काही वेळानं पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घातल्या. तर दुसरा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यात आल्यानं स्थानिक ज्यू बोर्डानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. ज्यू समुदायाचे नेतेही पोलिसांशी संपर्क साधून आहेत.
वडील आणि मुलाने ज्यू समुदायाला केले लक्ष्य- (Sydney Terrorist Attack Marathi News)
एपीच्या वृत्तानुसार, या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार वडील आणि मुलगा होते, त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियन तपास संस्थांनी आरोपींची पार्श्वभूमी तपासणी सुरू केली आहे. हल्लेखोरांची ओळख वडील आणि मुलगा म्हणून झाली आहे. 50 वर्षीय वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या 24 वर्षीय मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सिडनीत गोळीबार, पाकिस्तानचं कनेक्शन- (Sydney Terrorist Attack Pakistan Connection)
सिडनी हल्ल्याशी पाकिस्तानी संबंध असल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियन तपास संस्था या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हल्ल्यात सहभागी असलेले वडील आणि मुलगा पाकिस्तानी वंशाचे असल्याचे ओळखले गेले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शी मार्कोस कार्व्हालो म्हणाला, गोळीबाराचे आवाज फटाक्यांसारखे होते. मी बॉन्डीमध्ये गोळीबाराची कल्पनाही करू शकत नव्हतो. गोळीबाराचा आवाज ऐकताच मी पळू लागलो.
उत्तर बॉन्डी बीचवर मृतदेहांचा खच- (Sydney Terrorist Attack)
सदर घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये उत्तर बॉन्डी बीचवर अनेक मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ही घटना धक्कादायक आणि अत्यंत दुःखद असल्याचे वर्णन केले आहे.
























