(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar: दारूच्या व्यसनापायी पोटच्या मुलाकडून आईची हत्या, पालघरच्या तारापूर येथील घटना
Palghar: दारूच्या व्यसनापायी पोटच्या मुलाने त्याच्या वयोवृद्ध आईचा लाकडी दांडक्याने खून केल्याची घटना उघडकीस आलीय.
Palghar: दारूच्या व्यसनापायी पोटच्या मुलाने त्याच्या वयोवृद्ध आईचा लाकडी दांडक्याने खून केल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना सोमवारी (21 मार्च) रात्री तारापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घिवली गावात घडली आहे. मयत महिलेचे नाव रत्नप्रभा गंगानी असं होतं. आरोपी रुपेश गंगाणी (वय.39) बेरोजगार होता. त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलीय.
दरम्यान, सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मयत रत्नप्रभा गंगानी घिवली गावातील राहत्या घरात असताना त्यांचा मुलगा रुपेश याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. पैशांवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. भांडणा दरम्यान राग अनावर झाल्याने रुपेशने घरातील लाकडी दांडक्याच्या साहाय्याने मयत रत्नप्रभा यांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रत्नप्रभा गंगानी (वय.70) यांचा जागीच मृत्यू झाला होता.
आरोपी रुपेश गंगानी बेरोजगार आहे. त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर येत आहे. मयत रत्नप्रभा यांना तीन मुले असून त्यांची दोन मुले पोखरण गावात वास्तव्यास आहेत. घरात मयत रत्नप्रभा आणि त्यांचा मुलगा रुपेश दोघे राहत होते. त्यांच्यात नेहमी छोटे-मोठे वाद होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दारू पिऊन नेहमीच मारहाण करीत असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली.
याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रुपेश गंगानी याला अटक करण्यात आली आहे.न्यायालयाकडून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे देखील वाचा-
- Crime News : 'माता न तू वैरिणी'; 13 महिन्याच्या चिमुकलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न
- Ambernath Crime News : धक्कादायक! जादूटोणा करण्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण
- बोगस मेडिक्लेम पास करणाऱ्या डॉक्टर आणि लॅब चालकांचा भांडाफोड, विमा कंपन्यांकडून लाटायचे दोनशे ते तीनशे पट रक्कम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha