पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पतीकडून पॅरोलवर बाहेर आल्यावर दुसरा खून, दोन्ही हत्येमागे चारित्र्याचा संशय
पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पतीने पॅरोलवर बाहेर आल्यावर दुसरा खून केल्याची घटना घडलीय. या तीनही हत्येमागे चारित्र्याचा संशय हेच कारण असल्याची माहिती समजतेय.
सोलापूर : पत्नीच्या हत्येमुळे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीने आणखी एक खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील हा धक्कादायक प्रकार आहे. हत्येमागे चारित्र्याचा संशय हेच कारण असल्याची माहिती समजतेय.
आमसिध्द पुजारी असे या 64 वर्षीय आरोपीचे नाव आहे. काल दुपारी दीडच्या सुमारास मृत ज्ञानदेव नागणसुरे (वय 55) हे आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यात गाठून आरोपी आमसिद्ध पुजारी याने धारदार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्ञानदेव नागणसुरे यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपी आमसिद्ध पुजारी हा फरार झाला आहे.
आरोपी आमसिद्ध पुजारी याने 2009 साली चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केली होती. डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतः हुन पोलिसात देखील हजर झाला. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आमसिद्ध काही दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार गावी आल्यापासून आमसिद्ध हा हत्येच्या तयारीत होता. मला आणखी दोन खून करायचे आहेत असं तो नेहमी सांगत होता. यातूनच त्याने ही हत्या केल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. आमसिद्ध हा अद्याप फरार असल्याने मृत ज्ञानदेव नागणसुरे याचे कुटुंबीय देखील भीतीच्या छायेत आहेत. दरम्यान फरार आरोपी आमसिद्धला ताब्यात घेण्यासाठी पोलिसाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी दिली.
आरोपीला अटक
पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप झालेल्या आणि पॅरोल सुटल्यानंतर दुसरा खून करणारा आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपी आमसिद्ध पुजारीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दक्षिण सोलापुरातील एका शिवारातून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती. 2009 साली पत्नीचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केली होती. मात्र, पॅरोलवर तुरुंगातून सुटल्यानंतर काल ज्ञानदेव नागणसुरे यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोप आमसिद्ध पुजारी फरार होता. मात्र 30 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.