(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur Crime : शेतजमीन नावावर न केल्याचा राग, चार वर्षाच्या पुतणीला नदीत फेकलं; मोहोळमधील धक्कादायक घटना
Solapur Crime : आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी सख्ख्या भावाशी झालेल्या वादात पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली आहे.
Solapur Crime : आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी सख्ख्या भावाशी झालेल्या वादात पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ (Mohol) तालुक्यात घडली आहे. ज्ञानदा यशोधन धावणे असे चार वर्षीय मृत चिमुकलीचं नाव असून आरोपी काका यशोदीप धाकणे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मोहोळ तालुक्यातील डिकसळ इथला रहिवासी असलेल्या यशोधन शिवाजी धावणे यांची वडिलोपार्जित 16 एकर शेतजमीन आहे. यातील पाच एकर ही त्यांच्या नावे, पाच एकर भाऊ यशोदीप यांच्या नावे तर उर्वरित सहा एकर जमीन ही आईच्या नावे आहे. फिर्यादी यशोधन धावणे यांनी दिलेल्या जबाबानुसार आईच्या नावावर असलेली सहा एकर शेतजमीन ही आपल्या नावावर करुन द्यावी यासाठी आरोपी यशोदीप हा सातत्याने भांडण करत होता. गावातील लोकांनी बैठक घेत त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता.
20 फेब्रुवारीला पुन्हा भांडण, आरोपीकडून वंश संपवण्याची धमकी
याच कारणावरुन सोमवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात पुन्हा एकदा भांडण झाले. आईच्या नावावर असलेली 6 एकर जमीन वाटणी न करण्यात तुम्ही पती-पत्नी जबाबदार असून आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीपने यशोधनला शिवीगाळ केली. तसेच तुमचा वंश संपवतो अशी धमकी दिली. गावातील लोकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.
मुलगी घरी नसल्याने शोधाशोध
त्यानंतर चिमुकल्या ज्ञानदाचे वडील यशोधन हे आई आणि पत्नीसह शेतात गेले. काही कामानिमित्त घरी परतल्यानंतर घरात मुलगी ज्ञानदा आणि वडील शिवाजी हे दोघे घरात दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी वडील शिवाजी यांना फोन केला असता मी मंदिरात दर्शनासाठी आलो असून ज्ञानदा घरात झोपलेली असल्याचं सांगितलं. मात्र ज्ञानदा घरात नसल्याने त्यांनी आसपास चौकशी केली असता भाऊ यशोदीपने ज्ञानदाला गाडीवर नेल्याचे काही जणांनी सांगितलं. यावेळी भाऊ यशोदीपला फोन लावल्यानंतर मी तुझ्या मुलीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिलं असं सांगितलं.
जमिनीच्या वाटणीच्या वादात चिमुकलीचा जीव गेला
यशोधन यांना हे ऐकल्यानंतर धक्का बसला. त्यांनी तात्काळ मालिकपेठला धाव घेतली. तिथे नदी पात्रात ज्ञानदा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी तिला नदीतून काढले. ज्ञानदाला उपचारासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे शेतीच्या वाटणीच्या वादातून अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या केल्याने सख्ख्या काकाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा