Solapur News : अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून सोलापुरात अल्पवयीन पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला; डोक्याला इजा, दोन बोटंही तुटली
Solapur Crime : अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरुन अल्पवयीन पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली. या हल्ल्यात या नराधमांनी मुलीची दोन बोटं छाटल्याची माहिती समोर येत आहे.
Solapur Crime : अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरुन अल्पवयीन पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यात घडली आहे. आरोपींनी पीडित मुलीवर सत्तूर आणि कोयत्याने वार केले. या हल्ल्यात या नराधमांनी मुलीची दोन बोटं छाटल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय माने आणि नामदेव दळवी अशी आरोपींची नावं आहे. या दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (Attempt to Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीची पोलिसात तक्रार
मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी 6 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. पीडित तरुणी ही अल्पवयीन असून तिच्यावर 5 मार्च रोजी याच दोन आरोपींनी अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीने आरोपींविरोधात 5 मार्च रोजी बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुलीवर सपासप वार; डोक्याला दुखापत, दोन बोटंही तुटली
दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याच गुन्ह्याच्या तपास कामाच्या अनुषंगाने पीडित मुलीचे आई-वडील हे संध्याकाळी पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा रात्री आठच्या सुमारास आरोपी अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी हे पीडितीचे घरी आले. हातात असलेल्या सत्तूर आणि कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि कपाळाला दुखापत झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे हल्ल्यात तिच्या उजव्या हाताची दोन बोटं देखील तुटली आहेत.
हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
या हल्ल्यानंतर पीडित मुलगी ही बेशुद्ध झाली. तिला बेशुद्ध अवस्थेतच बार्शीतल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या गंभीर प्रकारांनंतर आरोपी अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम 307, 324, 326, 34, 452, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी शहर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
दरम्यान या घटनेत बार्शी शहर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची तक्रार 5 मार्च रोजी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या संदर्भात आरोपी तरुणांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. वास्तविक बार्शी शहर पोलिसांनी त्याच रात्री किंवा दुसऱ्या दिवशी दिवसभरात आरोपी तरुणांना अटक करणं गरजेचं होतं. मात्र हे झालं नाही. त्यामुळे गावातच राहणाऱ्या या आरोपींनी पीडित मुलीच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला.
हेही वाचा