Sangamner Crime : संगमनेरच्या हनुमान रथ मिरवणुकीतला वाद थेट पोलीस ठाण्यात, 11 जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं काय घडलं होतं?
Sangamner Crime : हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत आयोजक आणि ढोलताशा पथकातील सदस्यांमध्ये बाचाबाची होवून धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Sangamner Crime : गेल्या 96 वर्षांपासून हनुमान जयंतीनिमित्त चंद्रशेखर चौक येथील मोठा मारुती मंदिरापासून महिलांनी रथ ओढून मिरवणुकीला सुरूवात करण्याची परंपरा आहे. मात्र, यावर्षी मिरवणुकीला आयोजक आणि ढोलताशा पथकातील सदस्यांमध्ये बाचाबाची होवून धक्काबुक्की झाल्याने गालबोट लागले होते. याप्रकरणी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भैरवनाथ ढोलताशा पथकातील अकरा सदस्यांवर संगमनेर शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दरवर्षी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समिती मिरवणुकीचे आयोजन करत असते. यावर्षी देखील शुक्रवारी (दि.11) हनुमान जयंतीनिमित्त सलामीचे वादन चालू असताना विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमर्जी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर व सोनू गोविंद नालकर यांनी भैरवनाथ ढोलताशा पथक आणून वाजविण्यास सुरुवात केली. तेव्हा अॅड. गिरीष मेंद्रे यांनी वरील सहा जणांना तुम्ही ही सलामी होवू द्या, मग तुमचे वादन करा, असे सांगितले.
उत्सव तुमच्या बापाचा आहे काय?
याचा राग आल्याने उत्सव तुमच्या बापाचा आहे काय? असे म्हणून शिवीगाळ करुन धक्काबुक्की करु लागले. हे पाहून समितीचे इतर सदस्य हे वाद मिटवत असताना विनायक गरुडकर याने योगराज कुंदनसिंग परदेशी यांची गचांडी धरुन पोटात लाथ मारली. तर सौरभ उमर्जी याने धक्काबुक्की केली आणि विजारीच्या खिशातून चाकू काढून चेतन तारे यांना मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता अमोल क्षीरसागर याने समितीचे उपाध्यक्ष कमलाकर विश्वनाथ भालेकर यांना अरेरावीची भाषा वापरुन उद्या सकाळी तुम्ही चौकातून रथ कसा काढता तेच बघतो अशी धमकी दिली.
रथ थांबवून परिस्थिती चिघळेल, अशी कृती
तर सोनू नालकर याने मारुन टाका, जिवंत सोडू नका असा दम दिला. याचवेळी शेखर सोसे याने फायटरने किशोर उर्फ शुभम चंद्रकांत लहामगे यांच्या डोक्यात वार केला. परंतु, हा वार हुकवल्याने तो त्यांच्या खांद्यावर लागला. याशिवाय श्याम नालकर याने श्यामसुंदर रामेश्वर जोशी यांना परत येथे दिसल्यास मारुन टाकेल अशी धमकी दिली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मिरवणूक चालू असताना विनायक गरुडकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या व मयूर जाधव यांनी वाद्य आडवे लावत मिरवणुकीचा रथ थांबवून परिस्थिती चिघळेल अशी कृती केली. तर राहुल शशिकांत नेहुलकर याने आमच्या पथकाला वाद्य वाजवू दिल्याशिवाय रथ पुढे जावू देणार नाही असे म्हणाला.
अकरा जणांवर गुन्हा दाखल
त्यावर समितीचे सदस्य त्यास समजावण्यासाठी गेले असता विनायक गरुडकर याच्यासह साथीदारांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मयूर जाधव उर्फ पप्पू याने ढोल वाजविण्याच्या काठीने ज्ञानेश्वर अविनाश थोरात यांना फटके मारण्याचा प्रयत्न करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून जीवे मारण्याची धमकी दिली. याच दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मिरवणूक संपून रथ आल्यानंतर चेतन तारे यांना अल्पवयीन मुलाने गलोरीने मारुन दुखापत केली. याप्रकरणी समितीचे उपाध्यक्ष कमलाकर भालेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील अकरा जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा


















