Sanjay Raut : नाशिकच्या दर्ग्यावर बुलडोझर फिरवण्यासाठी आजचा दिवसच का निवडला? संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले...
Sanjay Raut on Nashik Satpeer dargah violence : या शहरात दर्गे हटाव मोहीम सुरू केली आहे. दर्ग्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. आजचा दिवस निवडला का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

Sanjay Raut on Nashik Satpeer dargah violence : नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा परिसरातील बांधकाम हटवण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आले होते. मात्र संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रण आणली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) एक दिवसीय निर्धार शिबिर पार पडत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केलाय.
संजय राऊत म्हणाले की, आमच्या शिबिरात अनेक प्रकारचे अडथळे घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते आम्हाला घाबरतात. शिवसेनेची अजूनही दहशत आहे. आज मला समजले की, या शहरात दर्गे हटाव मोहीम सुरू केली आहे. दर्ग्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. आजचा दिवस निवडला का? गोंधळ निर्माण व्हावा, या शिबिरावरचे लक्ष दुसरीकडे जावे म्हणून दर्ग्यांवर बुलडोझर चालवायचा, मशिदींवर बुलडोझर चालवायचा, हे कसले लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. तुम्हाला वातावरण नासवायचे आहे. वातावरण खराब करायचे आहे. मात्र ज्यांना देश तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले याचे काही आश्चर्य वाटत नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
कारवाई नंतर करू शकत होते, पण...
ही कारवाई नंतर करू शकत होते का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शंभर टक्के. कारवाई नंतर करू शकत होते. पण आजचा दिवस निवडला. कारण इथे उद्धव ठाकरे येत आहेत. आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत. शिवसेनेचे सर्व सहकारी इथे दाखल झाले आहे. आज नाशिकमध्ये महत्त्वाचे शिबिर आणि अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे आजचा दिवस निवडला. तुम्ही जळत आहात, तुम्ही डरपोक आहात. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते. शिवसेनेच्या सावलीची भीती वाटते. म्हणून तुम्ही असे फालतू उद्योग करत आहात. पण, या शिबिरावर काहीही परिणाम होणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वीच आजचा मुहूर्त काढला
दर्ग्यावर पंधरा दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती. त्याची मुदत काल रात्री संपली. त्यामुळे ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वीच आजचा मुहूर्त काढला. भारतीय जनता पक्षाचे लोकांचा याबाबतीत कोणीच हात धरू शकणार नाही. ते आधी मुहूर्त काढतात, कधी कुठे दंगल घडवायची? कधी कोणावर कारवाई करावी? यासाठी त्यांचे लोक मुहूर्त काढून पंचांग घेऊन बसलेले असतात, असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
अमित शाह राज्यात तीन पक्ष चालवतात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आमरस पुरीचा बेत होता ते खायला गेले होते. युती झाल्यावर बोलू, देवेंद्र फडणवीस काय ठरवतात? हे महत्त्वाचं आहे. अमित शाह हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शाह राज्यात तीन पक्ष चालवतात आणि ते प्रमुख आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी काही बोलू शकत नाही. मात्र त्यांचे देखील ध्येय धोरण दिल्लीवरून ठरते. कालच्या बैठकीत देखील काय झालं हे मला माहिती आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा























