(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज ठाकरे निर्दोष... इस्लामपूर न्यायालयाचा निर्णय, 16 वर्षांपूर्वीच्या खटल्यात मनसे अध्यक्षांना मोठा दिलासा
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. 2007 साली स्थापन केलेल्या मनसेने मराठीच्या मुद्द्यावरुन रान पेटवले होते.
सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना 16 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मनसेनं सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे 2008 साली केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यातून राज ठाकरे यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. इस्लामपूर न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे 2008 मध्ये मनसेनं (MNS) केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात गेल्या 16 वर्षांपासून खटला सुरू होता. शिराळा न्यायालयाने या प्रकरणी ठाकरेंना दोन वेळा अजामीनपात्र वॉरंटही बजावले होते. आता, तब्बल 16 वर्षानंतर या गुन्ह्यातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. 2007 साली स्थापन केलेल्या मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन रान पेटवले होते. दरम्यान, 2008 साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं मोठं आंदोनल उभारलं होतं. त्यावेळी, सांगली जिल्ह्याच्या शिराळ्यात 2008 साली दाखल झालेल्या गुन्ह्यात राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील रेल्वे भरती प्रकरणी मराठी मुद्यावरून मनसेने केलेल्या आंदोलनातील गुन्ह्यामधून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मनसे आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्यातून राज ठाकरे यांना इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे, कायदेशीर अडचणीतून राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण
मनसेनं 2008 मध्ये मराठीच्या मुद्द्यावरुन रेल्वे भरतीला विरोध करत आंदोलन उभारले होते. त्यावेळी, मध्ये रेल्वेने विविध पदांसाठी भरती सुरु केली होती. त्यात मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेनं महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले होते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातही आंदोलन झाले, येथील आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यानंतर, शेंडगेवाडी येथे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनेसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात दोन अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले होते. पण, राज यांच्या वकिलाने ते वॉरंट रद्द करुन घेतले होते. मात्र, इस्लामपूर न्यायालयाने याप्रकरणी निकाल देत राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता केली आहे.