(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : रिक्षाचालकाने विनयभंग केल्याचा बनाव कॉलेज तरुणीने का रचला?
रिक्षाचालक आणि रिक्षातील प्रवाशाने विनयभंग केल्याचा बनाव महाविद्यालयीन तरुणीने रचला. याबाबत तरुणीने लेखी जबाबही पोलिसांना दिला आहे. पण हा बनाव तिने का रचला याचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. मारहाण, हत्या, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पण अशातच एका तरुणीने स्वत:चा विनयभंग झाल्याचा बनाव रचल्याचं समोर आलं आहे. रिक्षाचालक आणि रिक्षातील प्रवाशाने विनयभंग केल्याचा बनाव महाविद्यालयीन तरुणीने रचला. याबाबत तरुणीने लेखी जबाबही पोलिसांना दिला आहे. पण हा बनाव तिने का रचला याचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. ही घटना 5 एप्रिलची आहे.
काय आहे प्रकरण?
तरुणीने बंडगार्ड पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, "आपण रिक्षाने महाविद्यालयात जाण्यासाठी निघालो होतो. यावेळी रिक्षाचालक आणि पाठीमागे शेजारी बसलेल्या व्यक्तीने माझ्या गळ्यात हात टाकून विनयभंग केला. त्यानंतर आपण रिक्षाचालकाला थांबण्यास सांगितलं असता कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी त्याने रिक्षा थांबवली. यानंतर पाठीमागे येऊन रिक्षाचालकाने आपल्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी आरडाओरडा केल्याने आरोपीने पेटत्या सिगारेटचे चटके माझ्या दंडाला दिले. यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मला रिक्षातून खाली ढकलून पळ काढला."
बनाव असल्याची तरुणीची कबुली
पुण्यातील आयनॉक्स मॉलसमोर भरदिवसा धावत्या रिक्षात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तरुणीच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तपास करत होते. त्यांनी फिर्यादी तरुणीकडे विचारपूस केली असता ती खोटं बोलत असून हा सर्व बनाव असल्याचं लक्षात आलं. आई-वडिलांना, घरच्यांना घाबरुन तिने हा सर्व बनाव रचल्याचं पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झालं. तिने तसा लिखित जबाबही पोलिसांना दिला आहे. परंतु हा बनाव तिने का रचला, ती घरच्यांना काय घाबरत होती, तिच्यासोबत नेमकं काय घडलं याचा तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा