Crime News: धक्कादायक! पुण्यात खाजगी सावकाराची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या
Pune Crime News : पुण्यातील हडपसरमध्ये एका खासगी सावकाराची निर्घुण हत्या केली असल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे,
Pune Crime News : विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. व्याजाच्या पैशावरून खाजगी सावकाराची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. हडपसर येथे ही घटना घडली आहे. या हत्येची भयंकर दृष्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
मागील काही दिवसांपासून पुण्यात खून, चोरी, दहशत यासारखे प्रकार सतत घडत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर पुण्यातील हडपसर परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. खासगी सावकारावर कुर्हाडीचे सपासप वार करुन ही निर्घृण हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपी गणेश खरात याने मयत युवराज जाधवकडून व्याजाने पैसे घेतले होते. सुरज मागील अनेक दिवसांपासून गणेश खरातकडे पैशाची मागणी करत होता. परंतु गणेश खरात हा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होता. याच रागातून युवराज जाधव याने गणेश खरात याच्या पत्नी विषयी अपशब्द वापरले होते. याच रागातून गणेश याने युवराज जाधव घराच्या अंगणात बसला असताना पाठीमागून जाऊन कुर्हाडीने एकापाठोपाठ एक असे अनेक वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने युवराज जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरात अवैध सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांनी सावकारांचा जाच कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला म्हणावे तसे यश आल्याचे दिसत नाही. सावकार वेळोवेळी पैसे न दिल्यास घाणेरड्या भाषेत बोलतात. कुटुंबाला धमकावतात महिलांविषयी घाणेरड्या कमेंट करतात. त्यातूनच हडपसर परिसरातील हा प्रकार घडला असल्याचे म्हटले जात आहे.