Pune: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात नक्की चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. वाढत्या गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या असून किरकोळ कारणांवरून टाेकाचे पाऊल उचलणे, कोयत्याची दहशत, दिवसाढवळ्या होणारे खून, तोडफोड, धाकदपट अशा घटना दररोज कानावर पडत आहेत. हत्या, दहशत, अपघात, महिलांवरील अत्याचार, चोरी आणि दरोड्याच्या घटनांनी पुणे शहर हादरुन जात आहे. दरम्यान, फ्लॅटच्या बुकिंगसाठी भरलेली रक्कम मागितल्याचा राग मनात धरून एका तरुणाने कोयता घेऊन थेट इस्टेट एजंटच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडलाय. हातात लांबलचक कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Pune Crime)
या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवत तरुणाकडून थेट कोयत्याने दहशत माजवणाऱ्या तरुणाचं नाव ऋषिकेश भगवान गायकवाड असे आहे. 29 वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. यावर पोलीस अधिक तपास करत आहेत.
नक्की घडले काय?
फ्लॅट न घेतल्यामुळे रक्कम परत मागण्यासाठी फिर्यादी कुटुंबीय गायकवाड यांच्या घरी गेले होते. त्यावेळी ऋषिकेशने कोयता घेऊन धमकी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इस्टेट एजंट असून त्यांनी उत्तमनगर परिसरातील एक फ्लॅट त्यांच्या आईच्या नावाने, नातेवाईक भगवान गायकवाड यांच्याकडून घेण्यासाठी 5 लाख रुपये आगाऊ दिले होते. मात्र काही आर्थिक अडचणीमुळे डिसेंबर महिन्यात फ्लॅट न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी भरलेली रक्कम परत मागितली. मात्र गायकवाड यांनी पैसे परत न करता वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. 15 एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय पैसे मागण्यासाठी गायकवाड यांच्या घरी गेले. त्यावेळी भगवान गायकवाड घरी नसताना, त्यांचा मुलगा ऋषिकेश गायकवाड याने अचानक घरातून लांब कोयता आणला आणि संतप्तपणे फिर्यादीच्या दिशेने धाव घेतला. या प्रकारामुळे घाबरलेल्या फिर्यादीने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.