श्रद्धा हत्याकांडात पोलिस डिजिटल पुराव्यांची मदत घेणार, आफताब सहकार्य करत नसल्याने निर्णय
Shraddha Murder Case : श्रद्धाच्या हत्येबाबत माहिती गोळा करत असताना पोलिसांना मृतदेहाचे पार्टस गोळा करणे कठीण जात आहे. शिवाय आफताब देखील वारंवार आपले जबाब बदलत आहे. त्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
Shraddha Murder Case : बदलत्या काळानुसार तंत्रज्ञामध्ये देखील बदल होत आहेत. त्यामुळे आता पोलिस देखील अनेक प्रकरणांमध्ये इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पुराव्यावर अवलंबून आहेत. दिल्ली पोलिसांना देखील आता श्रद्धा वालकर खून प्रकरणात इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पुराव्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. कारण आरोपी आफताब पूनावाला हा श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना सहकार्य करत नाही. त्यामुळे आफताबला शिक्षा होण्यासाठी डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची पोलिसांना कशी मदत होईल याची चाचपणी सध्या सुरू आहे. तपासांती कोणते इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे या प्रकरणाचा उलगडा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.
आफताब आणि श्रद्धा यांची भेट एका डेटिंग अॅपमुळे झाली. त्यानंतर दोघांची मैत्री वाढली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर त्यांचे संभाषण, कॉल सुरू झाले. त्यानंतर ते बरेच महिने एकत्र राहत होते. त्यामुळे त्यांच्यात झालेलं चॅटिंग, त्यांचं वास्तव्य या सगळ्याचे लोकेशन आणि इतर तपशील पोलिस तपासातून समोर येत आहेत. त्याच्या मदतीने काही सबळ पुरावे हाती लागत आहेत.
दुसरीकडे पोलिस आफताब आणि तिच्या मित्रांसोबत केलेल्या श्रद्धाच्या शेवटच्या व्हॉट्सअॅप संभाषणची माहिती घेत आहेत. याशिवाय पोलिस श्रद्धाच्या जवळच्या लोकांचे जबाबही घेत आहेत. ज्यामध्ये श्रद्धाचे मित्र - मैत्रिणी, कार्यालयातले सहकारी अशा एकूण अंदाजे 20 हून अधिक लोकांचे जबाब घेतले आहेत. बहुतेक जणांनी त्यांच्या श्रद्धासोबतच्या चॅट किंवा कॉलची माहिती आणि पुरावे दिले आहेत.
श्रद्धाच्या हत्येबाबत माहिती गोळा करत असताना पोलिसांना मृतदेहाचे पार्टस गोळा करणे कठीण जात आहे. शिवाय आफताब देखील वारंवार आपले जबाब बदलत आहे. त्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आफताबने त्याचा लोकेशन हिस्ट्री बंद केली होती. परंतु, त्याच्या सीडीआरमुळे त्याचे कॉल ट्रेस होऊ शकतात हे त्याला फारसे माहीत नव्हते. त्याची मोबाईल हिस्ट्री देखील या तपासात महत्त्वाची भूमिका बजावेल असे पोलिसांचे मत आहे. आफताबने शरीराचे अवयव कुठे फेकले हे तपासण्यासाठी पोलिस आफताबच्या वक्तव्यानुसार दिल्ली परिसरातील सीसीटीव्हीही तपासत आहेत.
दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत बाथरूममधून रक्ताचे डाग गोळा केले आहेत, जे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत. त्यापेक्षा पोलिसांना घटनास्थळावरून फारसे पुरावे मिळालेले नाहीत. आफताबने गेल्या काही महिन्यांत बहुतांश पुरावे नष्ट केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी डिजिटल पुरावे महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली.
महत्वाच्या बातम्या