Crime News : एकाला संपवण्यासाठी सहा जण जमले एकत्र, सिगारेट दिले नाही म्हणून मास्टरमाईंडचाच काढला काटा
pimpri chinchwad news : सिगारेट न दिल्याच्या रागातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
Crime News : पिंपरी चिंचवड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सिगारेट न दिल्याच्या रागातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. सुमित असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून तो फक्त 15 वर्षांचा आहे. त्याची हत्या करणारे त्याचे मित्र देखील अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमितच्या एका मित्राकडे कबुतर आहेत. कबुतराच्या ढाबळ चोरीवरून एकासोबत वाद सुरु होता. त्याला संपण्याच्या उद्देशाने सुमित आणि त्याच्या सहा मित्रांनी कट रचला. ऐनवेळी कबुतर सांभाळणारा मित्र बाहेर गेला. परंतु, सुमितसह उर्वरित सगळे सोमवारी मोशीतील निर्जनस्थळी जमले. त्यांच्या सोबत कोयता होता, ज्याचा काटा काढयचा होत तो भेटायला येण्याची वेळ ठरली होती. सर्व जण एकत्र आल्याने सुमित दारू आणि सिगारेट घेऊन मोशीतील निर्जनस्थळी आला. सर्वांची पार्टी रंगली, डान्स देखील झाला. या जोशात एकामागोमाग एक दारूचे ग्लास संपले. दुसरीकडे सिगारेटचे झुरके देखील ओढले जात होते. अशात रात्रीचे बारा वाजून गेले. ज्याला टपकवायचं होतं तो काही आलाच नाही. दारू आणि सिगारेटचा स्टॉक संपायला आला होता. त्याचवेळी एकाने सुमितकडे सिगारेट मागितली. मात्र, सुमितने त्याना सिगारेट देण्यास नकार दिला. सिगारेट न दिल्याच्या रागातून बाजूला ठेवलेला कोयत्याने सुमितच्या डोक्यात वार केला.
डोक्यात कोयत्याचा वर्मी घाव बसल्याने सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडला. रक्ताच्या पडलेल्या सुमितला तिथेच सोडून त्याचे सहा मित्र पसार झाले. मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने सुमितचा शोध सूरू केला. त्याचा पता लागत नसल्याने मंगळवारी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. सुमित दहावीत नापास झाला होता. त्याच्या वडिलांचे लहानपणीच निधन झालं होतं. आई एका शाळेत काम करून घर चालवते. यावरून सुमितचं कोणी अपहरण करण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला आणि सुमितचा मृतदेह आढळला. तेथून हत्येच्या अनुषंगाने सूत्र हलविण्यात आली. त्यातून सुमितच्या मित्रांनीच हत्या केल्याचं समोर आलं. त्यानुसार पाच अल्पवयीन मुलांना तब्यात घेण्यात आलं तर मुख्य हल्लेखोराचा शोध सुरु आहे.
ताब्यात घेतलेल्या पाच जणांकडे पोलिांनी चौकशी केली असता दहा रुपयांची सिगारेट न दिल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली. दरम्यान, अल्पवयीन मुलांनी एकाच्या हत्येचा रचलेला कट, त्यातून पुढं स्वतःच्याच मित्राची केलेली हत्या आणि त्या हत्येमागचे कारण हे खूपच धक्कादायक आहे.