Parbhani Crime News : परभणी हादरलं! अपहरण करून 14 वर्षीय मुलाला संपवलं; उधारीमुळे धाकटा भाऊ गमावला
Crime News : उसनवारीने घेतलेले पैसे परत न केल्याने एकाला आपला अल्पवयीन भाऊ गमवावा लागला आहे. अवघ्या 35 हजारांच्या उधारीसाठी या 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली.
परभणी : उसनवारीने घेतलेले पैसे परत न केल्याने एकाला आपला अल्पवयीन भाऊ गमवावा लागला आहे. आरोपींनी या अल्पवयीन मुलाचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. मोठा भाऊ घेतलेले पैसे देत नसल्याचा राग मनात ठेवत त्याच्या 14 वर्षीय लहान भावाचे अपहरण करत त्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
परभणीच्या पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील प्रकाश बोबडे यांच्या 14 वर्षीय लहान मुलाचे गुरुवारी दुपारी अपहरण करण्यात आले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी विविध तपास पथके नियुक्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या तपासात बालाजी चव्हाण आणि नरेश जाधव या दोन तरुणांची नावे समोर आली. दोन्ही आरोपी पसार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांनी शिताफीने अटक केली. या दोन तरुणांनी 14 वर्षीय बालकास त्याचा मोठा भाऊ पैसे देत नसल्याचा राग मनात ठेवला होता. या रागातून त्यांनी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी हात-पाय आणि तोंड बांधून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे नेले. त्याच ठिकाणी त्याला संपवलं आणि त्याचा मृतदेह टाकून पसार झाले असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दोन्ही तरुण आरोपीस अटक केली आहे. केवळ 35 हजार रुपयांसाठी या दोन जणांनी 14 वर्षीय बालकास अपहरण करून त्याची हत्या केल्याने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.
राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण
गावातील महिलेला उपसरपंच पदाचा राजीनामा दे म्हणत सरपंच (Sarpanch) आणि त्यांच्या कुटुंबियांकडून झालेल्या मारहाणीत उपसरपंच (Deputy Sarpanch) महिलेच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या (Parbhani) सेलुतील ब्राह्मणगाव इथे घडली आहे. या प्रकरणी सरपंचांसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
परभणीच्या सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव इथल्या उपसरपंच शशिकला कांबळे यांच्या घरी 5 ऑगस्ट रोजी गावच्या सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे,महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे हे सर्व जण आले आणि तुम्ही उपसरपंच पदाचा राजीनामा द्या असे म्हणत जोरदार वाद घातला. याच वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले आणि सरपंच साधना डोईफोडे यांच्या गटाकडून कांबळे यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत उपसरपंच शशिकला कांबळे यांचा मुलगा निखिल कांबळे या रॉडने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. रविवारी (6 ऑगस्ट) रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या निखिल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.