(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navi Mumbai Crime : आईची हत्या करुन 'क्राईम पेट्रोल' स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; अल्पवयीन मुलीचे कृत्य
सातत्याने क्राईम पेट्रोल मालिका पाहणाऱ्या नवी मुंबईतील एका अल्पवयीन मुलीने अभ्यासाचा तगादा लावणाऱ्या आईची हत्या केली. ती हत्या आत्महत्या असल्याचं भासवलं आणि पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
Navi Mumbai Crime : घरात कोणत्या सिरीयल बघितल्या जातात, कोणते थ्रिलिंग मुव्ही बघतो आणि याचा काय परिणाम लहान मुलांवर होऊ शकतात याचा विचारही आपण करीत नाही. मात्र क्राईम पेट्रोल सारख्या सिरीयल बघून अल्पवयीन मुलीने चक्क आईची हत्या करण्यापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे तांत्रिक पुरावेही मुलीने उभा करीत पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता.
अल्पवयीन मुलीने आपल्या आईची कराटे बेल्टने गळा दाबून हत्या करीत ती आत्महत्या असल्याचा बनाव केलाआहे. ऐरोली सेक्टर 7 मधील राकेश सोसायटी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आभ्यासासाठी आईकडून सारखा तगादा लावला जात असल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली अखेर त्या मुलीने पोलीसांना तपासात दिली आहे.
शिल्पा जाधव ( 41) यांची गळा दाबून हत्या त्यांच्याच अल्पवयीन मुलीने केली आहे. मुलगी नुकतीच 10 वी पास झाली होती. तिने डॉक्टर व्हावं असं आई-वडिलांच स्वप्न होतं. सीईटी परिक्षेत उत्तम मार्क मिळावे यासाठी मुलीला क्लास लावण्यात आले होते. आई-वडिलांची मुलीकडून आभ्यासाची अपेक्षा असली तरी मुलगी मात्र अभ्यासाकडे लक्ष देत नव्हती. यावरून आई आणि मुली मध्ये सारखे भांडण होत असे.
27 जुलै रोजी आभ्यासावरून शिल्पा जाधव यांनी मुलीला खडसावले असता मुलगी रागावून ऐरोलीत राहणाऱ्या मामाच्या घरी निघून गेली होती. यानंतर तिला समजावून परत घरात आणण्यात आले. परत 30 जुलै रोजी दुपारी मुलगी आभ्यास सोडून मोबाईल मध्ये वारंवार बिझी असल्याने शिल्पा जाधव यांनी मुलीला मारहाण केली. आपल्याला घाबरवण्यासाठी आईने चाकू हातात घेतला असल्याचा जबाब मुलीने दिला आहे. यावेळी दोघींमध्ये झटापट झाली. मुलगी प्रतिकार करीत असल्याने आईंने तिच्या हातावर चावा घेतला. यानंतर मुलीने जोराचा धक्का दिल्याने शिल्पा जाधव यांचा तोल जावून त्या बेडवर आपटल्या.
बेडवर आपटल्याने डोक्यात गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव झाल्याने त्या अर्धमेल्या झाल्या होत्या. याही अवस्थेत त्यांनी मुलीला मारण्यासाठी बेडवर पडलेला कराटे बेल्ट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तोच कराटे बेल्ट घेवून मुलीने आईचा गळा आवळला. डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने आईची ताकद कमी पडल्याचा फायदा घेत मुलीने कराटे बेल्ट गळ्याभवती जोरदार आवळून आईची हत्या केली. हा सर्व प्रकार बेडरूम मध्ये घडला होता.
आईची हत्या नसून आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी मुलीला क्राईम पेट्रोल सारख्या मालिका बघितल्याचा फायदा झाला. पुरावे कसे नष्ट केले जातात याची माहिती मालिका बघून आली होती. आईची हत्या केल्यानंतर तिच्या मोबाईल मधून वडील आणि मामांना मेसेज केला. मुलीच्या वागण्याला आपण कंटाळलो आहे, ती आभ्यास करीत नाही. त्यामुळे मी कोणतेही पावूल उचलू शकते. असा मेसेज करुन मुलीने इंटरलॉक करून बेडरूमचा दरवाजा ओडून घेतला. इंटरलॉकची चावी बेडरूम मध्ये ठेवली जेणेकरून आईने आतून दरवाजा बंद केला असल्याचे चित्र तयार होईल.
यानंतर मुलीने वडिलांना आणि मामा फोन करून आई बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. मामाने घरी येवून दरवाजा तोडला असता शिल्पा जाधव बेडवर पडल्या असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दिसून आले. रबाले पोलीसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता पोलीसांना संशय आला. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात गंभीर दुखापत आणि बेडवर पडून आत्महत्या कशी होईल.
रबाले पोलिसांनी पंचनामा करीत पोस्टमार्टम केला असता गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. यानंतर घरातील मयत शिल्पा जाधव यांच्या पतीची चौकशी केली असता आई-मुलीमध्ये आभ्यासावरून भांडण होत असल्याचे त्यांनी सांगतले. त्याच बरोबर मुलगी क्राईम पेट्रोल सारख्या सिरीयल बघत असल्याची माहिती दिली.
सुरुवातीला काहीच माहिती न देणाऱ्या मुलीला महिला पोलिसांनी विश्वात घेवून विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार कथन केला. आपणच आईची कराटे बेल्टने गळा आवळून हत्या केली असल्याची कबुली मुलीने दिली आहे. दरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याने आणि तिची मानसिक स्थिती ठिक नसल्याने अद्याप पोलीसांनी तिला ताब्यात घेतलेले नाही. येत्या दोन-तीन दिवसात तिला ताब्यात घेवून बालसुधारगृहात पाठवले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ABP Majha Exclusive : राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच, अनागोंदी कारभाराचा 'एबीपी माझा'कडून पर्दाफाश
- PM Suraksha Bima Yojana : दर महिन्याला एक रुपया गुंतवा आणि दोन लाखांचा विमा घ्या, 'असं' करा रजिस्ट्रेशन
- India Coronavirus Updates : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरला, गेल्या पाच महिन्यांतील सर्वात कमी रुग्णसंख्या