Nashik Crime : रिक्षाचालकासह साथीदारांची प्रवाशाला मारहाण, रोकड, फोन लंपास; प्रवासी गंभीर जखमी
Nashik Crime : रिक्षाचालकासह त्याच्या तीन साथीदारांनी एका 35 वर्षीय प्रवाशाला रिक्षामध्ये बसवत मारहाण करुन, त्याच्याकडील पैसे आणि मोबाईल फोन लुटला. नाशिकमध्ये ही घटना घडली.
नाशिक : नाशिककरांनो ऑटोरिक्षाने प्रवास करत असाल तर सावधान. कारण रिक्षाचालकासह त्याच्या तीन साथीदारांनी एका 35 वर्षीय प्रवाशाला रिक्षामध्ये बसवत मारहाण करुन, त्याच्याकडील पैसे आणि मोबाईल फोन लुटला. त्यानंतर प्रवाशाला रिक्षाबाहेर रस्त्यावर फेकून दिलं. मुंबई नाका पोलीस ठाण्यात काल (25 एप्रिल) गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरु आहे. अभिनेश गुप्ता असं या प्रवाशाचं नाव आहे .
नाशिकमधील द्वारका परिसरात शनिवारी (23 एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अभिनेश गुप्ता हे मुंबईकडे जाण्यासाठी द्वारका परिसरात उभे होते. मुंबईच्या गाडीत बसवून देतो असं सांगत आरोपी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी अभिनेशला रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर अंधारात रिक्षा थांबवत त्यांना बेदम मारहाण केली. अभिनेश यांच्याकडील चार हजार रुपये रोख आणि मोबाईल फोन असा एकूण 5 हजार 100 रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर त्यांना रिक्षामधून रस्त्यावर फेकून दिलं.
अभिनेश गुप्ता हे रात्रभर बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडून होते. रविवारी (24 एप्रिल) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेत प्रवासी अभिनेश गुप्ता गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या छातीला मार बसला असून बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान नवे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासमोर उभं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून महिलेची लूट, तृतीयपंथी आरोपी अटकेत
Kalyan Crime News : डोळ्यात मिरची पूड टाकली, त्यानंतर चाकूचा धाक दाखवला अन् व्यापाऱ्याला लुटलं
Nashik News : नाशिकच्या कारागृहातील खळबळजनक प्रकार, तुरुंग अधिकाऱ्यानेच केली कैद्याची मदत
Nagpur : सराफा व्यापाऱ्याला लूटणाऱ्या 6 आरोपींना अटक, भाजपचा कार्यकर्त्याचाही समावेश