Nagpur : सराफा व्यापाऱ्याला लूटणाऱ्या 6 आरोपींना अटक, भाजपचा कार्यकर्त्याचाही समावेश
Nagpur Crime News : दिवसाढवळ्या केतन बटूकभाई कामदार या सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना नागपूर पोलिसांनी अवघ्या वीस तासांत अटक केली आहे.
Nagpur : दिवसाढवळ्या केतन बटूकभाई कामदार या सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना नागपूर पोलिसांनी अवघ्या वीस तासांत अटक केली आहे. चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकल्यानंतर त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले होते. या शिवाय या लूट प्रकरणात माहिती देणाऱ्यासह प्लॅनिंग करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या सहा झाली आहे. पोलिसांनी आरोपींनकडून अकराशे ग्रॅम सोन्याचे दागिने सुद्धा जप्त केले आहे. महत्वाचं म्हणजे या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्याला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन लाखांचं रोख बक्षिस देणार असल्याचे शहर पोलीस आयुक्तांनी जाहीर केलं. त्यामुळे नागपूर पोलीस दलाच्या अनेक विभागातील शेकडो पोलीस अधिकारी आरोपींच्या मागावर होते.
दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील पाचपावलीच्या पुलावर दिवसाढवळ्या केतन कामदार नामक एका सराफा व्यापाऱ्याला चाकूने हल्ला करत त्यांच्या जवळील अकराशे ग्रॅम सोन्याचे दागिने काही आरोपींनी लुटल्याची घटना उघडकीस आली होती. सराफाला जखमी करून लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी परसली. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत सराफा व्यापाऱ्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घटनेची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच संपूर्ण नागपूर पोलीस विभाग आरोपींना जेरबंद करण्यासाठी अलर्टमोडवर कामाला लागले होते. त्यामुळे अवघ्या 20 तासात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नागपूर पोलिसांच्या विविध विभागांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे शहर पोलीस आयुक्तांनी या मोहिमेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चार लाख रुपयांचे रोख बक्षीस दिलं आहे.
200 तासांचे सीसीटीव्ही चेक
या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी अगदी वायू वेगाने तपासाला सुरुवात केली. फिर्यादी केतन कामदार हे गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळणे शक्य नसल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळासह केतन कामदार ज्या ज्या ठिकाणी गेले होते, अश्या शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचं काम सुरू केलं. सुमारे दोनशे तासांची फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणातील आरोपींचा शोध लागला, त्यानंतर सहा आरोपींना अटक करून पोलिसांनी सुमारे 60 ते 70 लाख रुपये किमतीचे 1100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sanjay Raut : निवडणुकीसाठी सारा खेळ? देशभरात दंगली भाजपनं घडवल्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- Angarki Sankashti Chaturthi 2022 : आज अंगारकी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व...
- Amway Money Laundering : अॅमवेवर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त; जाणून घ्या प्रकरण
- Amarnath : अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचं सावट, टीआरएफ संघटनेची धमकी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha