Kalyan Crime News : डोळ्यात मिरची पूड टाकली, त्यानंतर चाकूचा धाक दाखवला अन् व्यापाऱ्याला लुटलं
Kalyan Crime News : डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्यांनी व्यापाऱ्याला लुटलं. पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
Kalyan Crime News : खाकरा तयार करण्याच्या कारखाना असलेला एक वृद्ध व्यापारी कारखाना बंद करुन आपल्या घरी परतत होता. त्यावेळी एका तरुणानं वृद्ध व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत या व्यापाऱ्याकडील पैसे घेऊन हा लुटारु तरुण पसार झाला. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत लूट करणाऱ्या तरुणासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. विशेष म्हणजे, यातील एक आरोपी खाकरा व्यापाऱ्यासोबत काम करणारा होता.
डोंबिवली पूर्व पीएमटी कॉलनी परिसरात 62 वर्षीय गांगजी घोसर हे खाकरा तयार करण्याचा कारखाना चालवितात. 19 एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास खाकऱ्याची ऑर्डर देण्यासाठी जय भद्रा हा तरुण त्यांच्या कारखान्यात आला. ऑर्डरनुसार, त्यानं काही पैसे दिले. गांगजी हे घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यांनी त्यांच्या जवळील 35 हजार रुपये एका काळ्या रंगाच्या पिशवीत ठेवले. याच दरम्यान एक अनोळखी इसस तिथे आला. त्यानं त्याच्या हातातील मिरचीची पूड गांगजी यांच्या डोळ्यात टाकली. चाकूचा धाक दाखवित त्यांच्या हातातील रोकडची पिशवी घेऊन पसार झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, लुटणारा तरुण हा येता-जाता सीसीटीव्हीत कैद झाला होता. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांनी तपास सुरु केला. जयने पैसे दिल्यावर हा प्रकार घडल्यानं पोलिसांचा जयवर संशय होता. पोलिसांनी जय भद्राला ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं कबुली दिली. त्यानं सांगितलेल्या माहितीनंतर या प्रकरणातील लुटारू जितेंद्र जोशी याला अटक केली. जय भद्रा आणि जितेंद्र जोशी यांनी संगनमत करुन गांगजी यांना लुटलं होतं. या दोघांनी यापूर्वी असा प्रकार केला आहे का? याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :