Nashik Crime : पत्रकारांना मारहाण प्रकरणात त्र्यंबक नगरपरिषद अॅक्शन मोडवर, ठेकेदाराला बजावली नोटीस, 48 तासांचा अल्टिमेटम
Nashik Crime : त्र्यंबकेश्वरमध्ये साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला होता.

Nashik Crime : आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांवर झालेल्या मारहाण प्रकरणात आता त्र्यंबक नगरपरिषद (Trimbak Nagar Parishad) अॅक्शन मोडवर आली आहे. या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून वाहन फी वसुलीचे कंत्राट देण्यात आलेल्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्याला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
शनिवारी 20 सप्टेंबर रोजी साधू-संतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने प्रवेश फी वसुली दरम्यान रस्त्यावरच जबर मारहाण केली. या हल्ल्यात ‘पुढारी’चे किरण ताजणे, ‘झी २४ तास’चे येमेश खरे आणि ‘साम टीव्ही’चे अभिजित सोनवणे हे पत्रकार गंभीर जखमी झाले होते.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी तात्काळ कारवाई करत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी प्रशांत राजू सोनवणे, शिवराज आहेर आणि ऋषिकेश गांगुर्डे या तिघांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाने त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उभे केले गेले आहे.
1 कोटी 8 लाख रुपयांचा वार्षिक ठेका
नगरपरिषदेच्या माहितीनुसार, वाहन प्रवेश फी वसुलीचे काम ‘ए.एस. मल्टी सर्व्हिसेस, खारघर – नवी मुंबई’ या कंपनीकडे देण्यात आले आहे. हा एकूण 1 कोटी 8 लाख रुपयांचा वार्षिक ठेका असून, संबंधित कंपनीकडे शहरातील सफाई, पाणीपुरवठा आणि पार्किंग वसुलीचे काम देखील आहे. ठेकेदार अनिल शुक्ला यांच्याकडे हे कंत्राट असून, त्यांनी दोन स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत वसुलीचे काम सुरू ठेवले आहे. या अधिकाऱ्यांनी काही बाहेरच्या तरुणांना वसुलीसाठी नेमले असून, याच तरुणांनी पत्रकारांवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
नगरपरिषदेचा ठेकेदाराला अल्टिमेटम
पत्रकारांवरील हल्ल्यानंतर त्र्यंबक नगरपरिषदेने ठेकेदाराला कडक शब्दांत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, सदर घटनेमुळे नगर परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे आणि ठेकेदाराने करारातील अटींचा भंग केला आहे. "करारातील अट क्रमांक 3, 5 आणि 8 चा भंग झाला आहे. घटनास्थळी वसुली दराचे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. ही गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाची बाब आहे. 48 तासांच्या आत सविस्तर खुलासा द्यावा, अन्यथा कंत्राट रद्द करण्यात येईल," असे त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आणखी वाचा


















