Nanded Crime: बुलेटवरून चोरी करायचे, वाहन बदलून पसार व्हायचे; बुटावरून काढला माग आणि चोरांच्या मुसक्या आवळल्या
Nanded News : नांदेड पोलिसांनी फक्त चोरांच्या बुटावरून त्यांचा माग काढून दोघांना अटक केली आहे. ऐन दिवाळीच्या सणात मंगळसूत्र चोरीच्या घटना घडताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मुंबई: चोरट्यांच्या पायाच्या बुटावरून पोलिसांनी चोरांचा माग काढला आणि दोघांना बेड्या घातल्या आहेत. महिलांच्या गळ्यातील गंठण हिसकावून वाहन बदलून चोर गायब व्हायचे. नांदेड पोलिसांनी त्यांच्या बुटावरून पोलिसांनी चोरांचा माग काढला आणि त्यांना अटक केली आहे. नांदेड पोलिसांनी त्यांच्याकडून गंठण आणि दोन बुलेट जप्त केल्या आहे. सलमान खान असलम खान आणि तौफिक खान आयुब खान असं अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
चोरी केलेल्या बुलेटवरून महिलांच्या गळ्यातील गंठण सोनसाखळी हिसकावयाचे आणि पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरटे वेगवेगळ्या वाहनांचा वापर करायचे. पोलिसांनी मात्र चोरट्यांच्या पायातील बुटावरून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी महिलेच्या गळ्यातील गंठण पळवल्याची घटना घडली होती. ऐन दिवाळी सणाच्या दरम्यान सलग दोन दिवस चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या सूचनेवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी आठ पथकं तयार केली. या सर्व टीम सिव्हील ड्रेसमध्ये सातत्याने पेट्रोलिंग करत होत्या. ज्या मार्गावर घटना घडली, त्या मार्गावरील सीसीटीव्ही बारकाईने तपासण्यात आल्या. यावेळी चोरट्यांच्या पायातील बुटावरून पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान त्यांना ताब्यात घेतले.
अवघ्या 5 सेकंदात 90 हजार हातोहात लांबवले
दिवाळीचा सण तोंडावर असल्याने खरेदीसाठी लागणारे पैसे बँकेतून काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होतांना पाहायला मिळत आहे. तर, याच गर्दीचा फायदा उचलत काही भामटे नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत आहे. नांदेडमध्ये देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. दिवाळीसाठी एका मुख्याध्यापकाने बँकेतून 90 हजार रूपये काढले. परंतु, बँकेतून गाडीपर्यंतही जात नाही, तोच चोरट्याने हातचालाखी करत त्यांचे 90 हजार लंपास केले. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील एसबीआय बॅंकेत बुधवारी दुपारी घडली.
अधिका माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेत साहेबराव देशमुख मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी 2 वाजता ते पैसे काढण्यासाठी हिमायतनगर शहरातील भारतीय स्टेट बैंकेच्या शाखेत गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या खात्यातून 90 हजार रुपये काढले. तसेच, काढलेले पैसे स्वतः जवळ असलेल्या बॅगमध्ये टाकून बॅग पाठीवर अडकवली. यावेळी दोन चोरटे त्यांच्यावर पाळत ठेऊन होते. साहेबराव देशमुख बँकेत असताना एक चोरटा पिशवी घेऊन त्यांच्या मागे खेटून चालू लागला. बॅगची चैन काढून त्याने अलगद आपल्या पिशवीमध्ये पैसे काढून घेतले. चोरट्यांनी अवघ्या 4 ते 5 सेंकदात मुख्याध्यापकाचे 90 हजार रुपये लंपास केले.
ही बातमी वाचा: