गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
Nalasopara Gang Rape : या प्रकरणातील तीनही आरोपी फरारी असून एक आरोपी हा भाजपचा पदाधिकारी होता. गुन्हा दाखल होताच भाजपने त्याला पदमुक्त केलं.
पालघर : नालासोपाऱ्यातील आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 22 वर्षीय तरुणीवर गुंगीचे द्रव्य पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपींमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच भाजपाने त्याला पदमुक्त केलं आहे. संजू श्रीवास्ताव (35 ), नवीन सिंग आणि हेमा सिंग असं आरोपींची नावं असून ते फरारी आहेत.
ही घटना 2021 सालची असून होळीच्या दिवशी संजू श्रीवास्ताव याने एका 22 वर्षीय तरुणीला कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने नालासोपारा येथील घरी बोलावले. तेथे तिला गुंगीकारक द्रव्य पाजून तिच्यावर श्रीवास्तव आणि नवीन सिंग या दोघांनी बलात्कार केला होता. त्यावेळी तिच्या काढलेल्या अश्लील चित्रफितीच्या आधारे नवीन सिंग याने ब्लॅकमेल करत सातत्याने तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यानच्या काळात पीडित गर्भवती राहिली होती. मात्र तिच्या सहमती शिवाय तिचा गर्भपात आरोपीने घडवून आणला. यानंतरही पीडितेला आरोपीपासून एक मुलगी झाली आहे. मात्र सतत आरोपींकडून धमकी आणि शिविगाळ केली जात असल्याने पीडितेने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी आरोपी संजू श्रीवास्तव, नवीन सिंग आणि हेमा सिंग यांच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार आहेत.
भाजपाचे वसई विरार जिल्ह्यात एकूण 8 उपाध्यक्ष आहेत. संजू श्रीवास्तव हा नायगाव मधील चित्रिकरण स्टुडियोमध्ये युनियन चालवतो. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला पदमुक्त करण्यात आले आहे अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिली.
ही बातमी वाचा: