मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
अंजली दमानिया यांनी ट्विट करुन बीडमधील अधिकारी वर्ग हा मंत्री धनंजय मुंडेंच्या मर्जीतील व त्यांच्याच समजाचा असल्याचं म्हटंल आहे.
मुंबई : बीडमधील सरपंच हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये (Beed) राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या सत्तेच्या गैरवापराबाबत विरोधकांनी आवाज उठवला आहे. आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात छोटे आका व मोठे आका यांची दहशत असल्याचे सांगत येथील पोलीस व प्रशासनात सगळे ह्या नेत्यांचेच अधिकारी असल्याचं म्हटलं होतं. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनी देखील हे प्रकरण सुरुवातीपासून लाऊन धरलं आहे. याप्रकरणातील आरोपींना अटक करुन कडक कारवाई करावी, या मागणीसह बीडमध्ये वाल्मिक कराडची असलेली दहशत सरकारने मोडून काढावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता, बीडमध्ये एका विशिष्ट समाजाचेच अधिकारी का आहेत, असा सवाल उपस्थित करत अंजली दमानिया यांनी परळीतील तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांची नावेच जाहीर केली आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा बीडमध्ये जातीय समीकरण कसं हाताळलं जातं हे समोर आलंय.
अंजली दमानिया यांनी ट्विट करुन बीडमधील अधिकारी वर्ग हा मंत्री धनंजय मुंडेंच्या मर्जीतील व त्यांच्याच समजाचा असल्याचं म्हटंल आहे. ''वंजारी समाजात भगवान बाबांसारखे विचारवंत होते ज्यांनी ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा समन्वय त्यांनी साधला. त्यांचा नावाचा आणि कर्तुत्वाचा दुरुपयोग करुन काही राजकीय नेते आणि वाल्मिक कराड सारखी माणसं, या समजाला बदनाम करत आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणसं परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत, माझा आक्षेप ह्यावर नक्कीच आहे, असे म्हणत दमानिया यांनी परळीतील अधिकाऱ्यांची नावासह यादीच शेअर केली आहे.
सगळ्या वंजारी समाजातील लोकांनी जाग व्हायला हवं आणि ही माणसे फक्त समाजाचा वापर करत आहेत हे समजून घ्यायला हावं. मुद्दा समजावण्यासाठी मी पूर्ण यादी देत आहे, असेही त्यांनी म्हटलं. तसेच, राज्य शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असेही त्यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.
परळीतील अधिकाऱ्यांची पद व नावे
परळी शहर पोलीस स्टेशन प्रमुख - रवी सानप
परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख - सुरेश चाटे
परळी तहसीलदार - श्री. व्यंकटेश मुंडे
परळी गटविकास अधिकारी - विठ्ठल नागरगोजे
परळी सह गटविकास अधिकारी - एस एस मुंडे
दरम्यान, हा समाज वाईट आहे, असे माझे म्हणणे मुळीच नाही. मात्र, त्यांचा फक्त वापर होतोय हे ह्यातलं सत्य आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा