IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांना पदोन्नती देण्यात आली असून भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी कररण्यात आली आहे.
मुंबई : प्रशासकीय सेवेतील आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशान्वये हे आदेश पारीत करण्यात आले आहेत. त्यामध्ये, पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी आणि माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्याजागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी (Collector) जितेंद्र डूडी यांना पदभार देण्यात आला आहे. तर, साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदी पुण्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये राज्यातील 10 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काहींना पदोन्नती प्रमोशन देण्यात आलं आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांना पदोन्नती देण्यात आली असून भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी कररण्यात आली आहे. ''आपणांस भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकालिक वेतन श्रेणीत (Level 14 of the Pay Matrix) पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक 1 जानेवारी 2025 पासून पदोन्नती देण्यात येऊन, पदोन्नतीनंतर आपली नियुक्ती जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे या रिक्त पदावर करण्यात येत आहे. आपल्या जागी जितेंद्र डूडी, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जितेंद्र डूडी, भाप्रसे यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार निरंजन कुमार सुधांशु, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा,'' असे परिपत्र जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, बोगस प्रमाणपत्राचा वापर करुन आयएएस पदावर विराजमान झालेल्या माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले होते. मात्र, दिवसे यांनी हे सर्व आरोप फेटाळत पूजा खेडकर यांचा बनाव असल्याचे म्हणत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची बदली
साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुण्याचे कलेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, जिल्हाधिकारी, पुणे या पदावर डॉ. सुहास दिवसे, भाप्रसे यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे. आपल्या जागी श्री. संतोष पाटील, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी, आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार डॉ.दिवसे, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा, असे पत्र अवर सचिव व्ही. राधा यांनी जारी केले आहे.
संतोष पाटील साताऱ्याचे जिल्हाधिकारी
पुण्यातील जिल्हा परिषद सीईओ संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, जिल्हाधिकारी, सातारा या पदावर श्री. जितेंद्र डूडी, भाप्रसे यांच्या जागी केली आहे. तरी, आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे बदली आदेश पारीत करण्यात आले आहेत.
हेही वाचा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच