(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Badlapur Encounter : बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, वडिलांची उच्च न्यायालयात धाव
Badlapur Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणात इतर आरोपींचा सहभाग असून त्यांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा जीव घेण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मुंबई : बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच माझ्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला असून तशा आशयाची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी करण्यात येणार आहे.
बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीला त्यांच्या वडिलांकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर केला असल्याचा आरोप त्यांनी केला. या कथित चकचकीबाबतचे पुरावेही नष्ट करण्याची भिती अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेतून व्यक्त केली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील सहा आरोपी अद्यापही फरार असून तेही तेवढेच जबाबदार असल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. अक्षयला खोट्या आरोपात गोवण्यात आले असून राजकीय बळी दिल्याचा पालकांचा आरोप आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी तातडीनं सुनावणी होणार आहे.
अती रक्तस्त्रवाने मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनातून उघड
अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने झाल्याचं त्याच्या शवविच्छेदन अहवालातून उघड झालं आहे. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे.
जेजे रुग्णालयात सात तास सुरु असलेल्या शवविच्छेदन प्रकियेची व्हिडीओग्राफी करण्यात आली आहे. जेजे रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांच्या पॅनलने अक्षय शिंदेचं शवविच्छेदन केलंय.
बदलापूर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे
बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. सीआयडीसोबतच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी होणार आहे. नवी मुंबईचे सीआयडी अधीक्षक हे तपास पथकाचे प्रमुख असतील. आजच सीआयडीचं पथक ठाण्यात दाखल होणार आहे..
शवविच्छेदनाच्या वेळी अक्षय शिंदेचे फिंगर प्रिंटसही घेण्यात आले आहेत. तिकडे फॉरेन्सिक टीमनं पोलिसांच्या ज्या गाडीत अक्षयचा एन्काऊंटर झाला त्या गाडीची पाहणी केली. तसंच मुंब्रा बायपासजवळच्या घटनास्थळाचीही पाहणी केली.
ही बातमी वाचा: