Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ विदेश दौऱ्यावरुन महाराष्ट्रात नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज होते, विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरु असताना ते नाशिकला आले होते. त्यानंतर ते विदेश दौऱ्यावर गेले होते. विदेश दौऱ्यानंतर छगन भुजबळ आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी छगन भुजबळ यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. कुणाचंही मंत्रिपद काढून घेत मला नको आहे, असं देखील ते म्हणाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं उदाहरण देत छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली.
छगन भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचा उद्या जन्मदिवस आहे, तर आज रात्रीच आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार आहोत. उद्या सकाळी नायगावला जाणार आहे. 2000 पासून दरवर्षी जातोच आणि तिथेच मग मुख्यमंत्री आणि सर्वांचा कार्यक्रम आहे. चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे केले आहेत. त्या पुतळ्यांच्या अनावरणाला शरद पवार साहेब येणार आहेत, मी पण सुद्धा तिथं आमंत्रित आहे, मी तिथं जाणार आहे. पिंपरी चिंचवडला देखील एक कार्यक्रम आहे, तिकडे जाणार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.
विदेश दरात मला कुणाचाही फोन वगैरे आले नाहीत. मला आले असले तरी सांगू शकणार नाही. थोडावेळ राजकारणातून डोकं पूर्णपणे बाजूला काढलं होतं. आयुष्यभर राजकारण करतोच आहे, 1967 पासून 66-67 पासून, राजकीय डोक्याला आराम द्यावा लागतो, असं भुजबळ म्हणाले.
देवेंद्र फडणवीस मला मंत्रिपद किंवा काहीही बोलले नाहीत. सात आठ दिवस थांबा चर्चा करु म्हणाले आहेत. ते काही मला मंत्री करतो म्हणालेले नाहीत. थांबा शांततेनं चर्चा करु,असं ते म्हणाल्याचं छगन भुजबळ म्हणाले. शरद पवार - अजित पवार एकत्र येत असतील तर त्याला शुभकामना आहेत, असंही भुजबळ म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या संदर्भात विचारलं असता भुजबळ यांनी वडेट्टीवार काय म्हणतात, जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्यावर काय चर्चा करु शकतो. मला मंत्रिपदं मिळालं पाहिजे म्हणून कुणाचं तरी काढा असं काही माझ्या मनात नाही. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे हा संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भुजबळ यांनी भूमिका मांडली.
मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे हे ओळखणारे मनकवडे कधी झालात. आपण संध्याकाळी भेटूयात, कार्यक्रमाला नक्की या सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले ही आमची ऊर्जाकेंद्र आहेत. दरवर्षी महात्मा फुले वाडा, नायगावला जात असतो. सामाजिक काम करणं, समाजकारण हा आमचा बेस आहे. राजकारण हे त्याचं साधन आहे, साध्य नाही. त्याप्रकारे काम करुया, असं छगन भुजबळ म्हणाले.
इतर बातम्या :