(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime News : नातवाला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत आजीला 21 लाखांना गंडवले; गुन्हा दाखल
Nagpur Crime News: इंजिनिअरिंग झालेल्या नातवाला शासकीय नोकरीचे आमिष दाखवत तीन व्यक्तींनी त्याच्या 70 वर्षीय वृद्ध आजीकडून तब्बल 21 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Nagpur News नागपूर : इंजिनिअरिंग झालेल्या नातवाला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तीन व्यक्तीनी युवकाच्या 70 वर्षीय वृद्ध आजीकडून तब्बल 21 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना नागपूरच्या (Nagpur News) हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 ऑक्टोबर 2021 ते 5 ऑक्टोबर 2023 दरम्यान घडली. मात्र या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे उशीरा लक्षात आल्याने पीडित तरुणाने हुडकेश्वर पोलीस स्टेशन (Nagpur Police) गाठून तक्रार दिली आहे.
गिरीधर पंढरीनाथ अंबर्ते (45, रा. सतनामीनगर, सीए रोड नागपूर), कैलास जाधव (40, रा. विजयनगर, नालंदानगर, खामगाव रोड, बुलढाणा) आणि अमोल पाटील (60, रा. पीएमटी बस डेपोजवळ, कोथरूड पुणे) अशी फसवणूक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर विमल सुधाकर हिवसे (70, रा. गजानननगर, मानेवाडा बेसा रोड) असे फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.
आजीला 21.50 लाखांनी गंडविले
विमल यांचा मुलगा संजय सुधाकर हिवसे (45) याचा मित्र असलेला संशयित आरोपी गिरीधरचे त्यांच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. गिरीधर हा नेहमीच आपली विविध क्षेत्रातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांसोबत ओळख असून आपण अनेक मुलांना शासकीय नोकरी लावून देत असल्याची बतावणी केली. विमल यांचा नातू यश संजय हिवसे (21) याने इंजिनिअरिंग केले असून तो सध्या नोकरीच्या शोधात आहे. गिरीधरने यांच संधीचा फायदा घेत मी नोकरी लावून देईल असे यशला आश्वस्त केले.
त्यानंतर गिरीधरने यशला म्हाडामध्ये कनिष्ठ अभियंता पदावर नोकरी लावून देण्यासाठी अर्ज भरण्यास सांगितले आणि या पदावर नोकरी हवी असल्यास 19 लाख रुपये जमा कारवे लागतील, असे सांगून सुरुवातीला 2 लाख रुपये मागितले. त्यानंतर गिरीधरने विमल यांची इतर संशयित आरोपी असलेल्या कैलास आणि अमोल यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर संशयित आरोपींनी संगनमत करून विमल यांच्याकडून काही महिन्यांच्या अंतराने 18 लाख 50 हजार रुपये उकळले. दिलेल्या पैशांची सिक्युरिटी म्हणून पुराव्याखातर संशयित आरोपी कैलासने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा देखील लिहून दिला.
फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू
ठरल्याप्रमाणे यशने म्हाडामध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करत परीक्षा दिली. मात्र काही दिवसांनी यश परीक्षेत नापास झाल्याचे सांगून आरोपींनी दुसऱ्या परीक्षेत काम करून देऊ, असे सांगून पुन्हा विमल यांच्याकडून आणखी 3 लाख रुपये घेतले. मात्र बराच वेळ होऊन देखील नोकरी संदर्भात कुठलीही हालचाल न दिसल्याने विमाल यांना शंका आली. त्याबत जाब विचारले असता संशयित आरोपींनी टाळाटाळ करून विमल यांच्या नातवाला नोकरी लावून न देता त्यांची 21 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक केली. पैसे परत मागितले असता संशयित आरोपी कैलासने त्यांना वेगवेगळ्या तारखेचे चेक दिले. परंतु ते चेकही वटले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, विमल यांनी पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या