(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : मोबाईलमध्ये गेम खेळण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे 22 लाख रुपये लुटले, दोघे अटकेत
Mumbai Crime : मोबाईलमध्ये गेम खेळण्याच्या बहाण्याने दोघांनी एका ज्येष्ठ नागरिकाचे तब्बल 22 लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.
Mumbai Crime : मुंबई पश्चिम उपनगरातील गोरेगावमधून सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. बेस्टमधून निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला ठकांनी लुटलं. व्हिडीओ गेम खेळण्याच्या बहाण्याने या ज्येष्ठाकडून ठकांनी मोबाईल फोन मागितला. गेम खेळता खेळता ज्येष्ठाच्या बँक खात्यातून गुगल पेद्वारे तब्बल 22 लाख रुपये काढले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
पोलीस उपायुक्त सोमनाथ घारगे यांच्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्वमध्ये राहणारे 68 वर्षीय प्रकाश नाईक हे बेस्टमधून सेवानिवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीनंतर त्यांना बेस्टकडून 22 लाख रुपये मिळाले होते. निवृत्त झाल्यानंतर ते कायम दिंडोशी बस डेपोजवळ फिरायला जात होते. तिथेच त्यांची ओळख दोन अज्ञात तरुणांसोबत झाली. हळूहळू त्यांचा परिचय वाढला आणि नाईक यांचा विश्वास संपादित केला.
एक दिवस दोघांनी नाईक यांच्याकडून त्यांचा मोबाईल फोन मागितला. आम्हाला मोबाईलमध्ये गेम खेळायचा आहे, असं कारण त्यांनी सांगितलं. यानंतर आरोपींनी नाईक यांच्या फोनमध्ये गुगल पे डाऊनलोड केलं. मग दोन महिन्यात अंतराने 22 लाख रुपये काढले. ही बाब लक्षात आल्यानंतर नाईक आपल्या खात्याची माहिती घेण्यासाठी बँकेत पोहोचले. आपल्या खात्यातून गुगल पेच्या माध्यमातून 22 लाख रुपये काढल्याचं समजल्यानंतर त्यांना धक्का बसला.
यानंतर प्रकाश नाईक यांनी थेट दिंडोशी पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी नाईक यांच्या माहिती आणि तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले त्यांची तपासादरम्यान चौकशी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी शुभम तिवारी (वय 22 वर्ष) आणि अमर गुप्ता (वय 28 वर्ष) यांना अटक केली.
चौकशीदरम्यान दोघांनी सांगितलं की ते गुगल पेच्या माध्यमातून पैसे स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करत होते आणि पैसे गेल्याचा जो मेसेज यायचा तो तातडीने डिलीट करायचे जेणेकरुन नाईक यांना समजणार नाही. या आरोपींनी आतापर्यंत अशाप्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत.