(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News : बीडमध्ये सैराटची पुनरावृत्ती? आंतरजातीय विवाह केलेलं जोडपं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलं
Beed Crime News : पती-पत्नीचा गळफास अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दीड वर्षापूर्वीच त्यांचा आंतरजातीय विवाह झाला होता.
Beed Crime News : बीड जिल्ह्याच्या (Beed District) आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे हृदयद्रावक घटना समोर आली असून, पती-पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. विशेष म्हणजे मृतदेह आढळून आलेल्या दोघांनी दीड वर्षापूर्वीच आंतरजातीय विवाह केला होता. ईश्वर गुंड (वय 34 वर्षे) आणि ऋतुजा ईश्वर गुंड (वय 26 वर्षे) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. तर हा सर्व प्रकार आत्महत्या आहे की घातपात आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी (23 मे) रोजी ईश्वर आणि ऋतुजा दोघेही कांदे काढण्यासाठी शेतात गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरीच परतलेच नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी शेतात जाऊन त्यांचा शोध घेतला. बराच शोध घेतल्यावर रात्रीच्या वेळी ईश्वरचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे नातेवाईकांना धक्काच बसला. दरम्यान याची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी ईश्वरचा मृतदेह खाली उतरवत शासकीय रुग्णालयात पाठवला. पण यावेळी ऋतुजा आढळून आली नाही.
मंगळवारी रात्री ईश्वरचा मृतदेह आढळून आल्याने आज सकाळी पुन्हा नातेवाईकांनी शेतात जाऊन ऋतुजा शोध घेतला. दरम्यान बुधवारी सकाळी शेतातच इतर ठिकाणी ऋतुजाचा देखील मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ईश्वर आणि ऋतुजाचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान बीडच्या अंभोरा पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
आत्महत्या की घातपात?
मिळालेल्या माहितीनुसार ईश्वर गुंड व ऋतुजा यांचा दीड वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी दोघेही शेतात कांदा काढण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळी दोघेही घरी परतले नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर रात्री शेतात ईश्वरचं आणि सकाळी ऋतुजा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आल्याने हा घातपाताचा प्रकार तर नाही ना अशी चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांकडून सर्वच बाजूने तपास केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed News : "लेकरांकडे लक्ष दे, मी धरणात उडी मारतेय"; भावाला फोन करून बहिणीची आत्महत्या