(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
Maharashtra CM and DCM: एकनाथ शिंदे यांनी भाजपची केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर नाकारली आहे. एकनाथ शिंदे हे राज्यातच राहणार आहेत. श्रीकांत शिंदे यांनाही महाराष्ट्राच्या राजकारणात परत आणणार?
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण, हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती करुन भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या (Maharashtra CM) शर्यतीमधून माघार घेतली असली तरी त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे महायुतीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाच्या वृत्तानुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते बुचकाळ्यात पडले आहेत. भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याबाबत भाजपच्या वर्तुळात अद्याप खल सुरु असून त्यामुळेच महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या ऑफरबाबत आता भाजपच्या थिंक टँकमधील नेते काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्यास राजी असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल, हे बघावे लागेल. कारण कालपर्यंत दिल्लीतील राजकारणाशी संबंध असलेल्या श्रीकांत शिंदे यांना थेट अजित पवारांच्या पंक्तीला आणून बसवणे, कितपत योग्य ठरेल, हा प्रश्न आहे. राजकीय आणि प्रशासकीय अनुभव या दोन्ही बाबतीत अजित पवार हे श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा कैकपटीने वरचढ आहेत. अशावेळी श्रीकांत शिंदे यांना थेट त्यांच्याच बरोबरीचे पद देणे अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल, याबाबत शंका आहे.
अजित पवारांच्या खेळीमुळे शिंदेंचा डाव फिस्कटला
महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आमचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला 132 जागा जिंकल्यामुळे प्रचंड मोठे यश मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरील भाजपचा दावा भक्कम झाला होता. परंतु, एकनाथ शिंदे यांनी किमान अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळावे, ही मागणी लावून धरली होती. परंतु, अजितदादा गटाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊन शिंदे गटाच्या मागणीतील हवाच काढून घेतली होती. अजितदादा गटाच्या पाठिंब्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली, अशी खंत शिंदे गटाच्या रामदास कदम यांनी बोलून दाखवली होती.
आणखी वाचा
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा