53 किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे दागिने जप्त, विधानसभेच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये घबाड सापडलं
Maharashtra Assembly Elections 2024 : अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडल्याने खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू संबंधित कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने-चांदी आणि हिरे, मोत्याचे दागिने घेऊन बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव या ठिकाणी चालले होते. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने त्यांची चौकशी केली. याबाबत वेगवेगळी माहिती वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
53 किलो चांदी, हिरे-मोत्यांचे दागिने जप्त
या कारवाईत चांदीची चाळीस किलोची वीट, सोन्याची बिस्किटे, तर एकूण 53 किलो चांदी, हिरे-मोत्यांचे दागिने ताब्यात घेतले आहे. तपासणीत 14 अधिकृत पावत्याही आढळून आल्या. तर वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. सुपा पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर आणि कंपनीच्या प्रतिनिधींसमोर या संबंधीचा 15 पानांचा पंचनामा केला आहे.
चार जण ताब्यात
कारवाईतील सोन्या-चांदीच्या विटांसह इतर सोने, हिऱ्याचे दागिने आयकर विभागाकडे जमा करण्यात आले आहे. बिलांची खात्री केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलीये. या प्रकरणी बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी चालक शांतकुमार कट्टीवल्ली, भय्यासाहेब बनसोडे, दिगंबर काजळे, बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे असिस्टंट मॅनेजर गोरख भिंगारदिवे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाई एकच खळबळ उडाली आहे.
कुलाब्यातून 10 कोटी किमतीचे डॉलर्स ताब्यात
दरम्यान, गुरुवारी मुंबईच्या कुलाब्यातून 10 कोटी किमतीचे डॉलर्स ताब्यात घेण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मरीन ड्राईव्ह येथील बालमोहन परिसरात नाकाबंदी दरम्यान ही रक्कम आढळली आहे. मात्र ही रक्कम मर्चटांईन बँकेची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे परदेशी चलन भारतीय चलनात रुपांतरीत करण्यासाठी घेऊन जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कस्टम अधिकारी यांच्याकडून देखील या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. विमानतळावरुन या संदर्भात परवानगी होती का? याची ही माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर पुरावे मिळाल्यानंतर ही रक्कम परत करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आणखी वाचा