सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सोलापूर जिल्ह्यातील सावंत कुटुंबातील वाद समोर आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत (Shivaji Sawant) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली.
Shivaji Sawant : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) अनेक घराघरात आणि मोठ्या राजकीय घराण्यात फूट पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशातच आता सावंत कुटुंबातील वादही समोर आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत (Shivaji Sawant) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिल्याचा आरोप शिवाजीराव सावंत यांनी केलाय. सावंत परिवारात चुलत्या- पुतण्यामध्ये पाठिंबा सत्रावरुन राजकीय घमासान असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सावंत कुटुंबात 1992 पासून मी राजकारणाला सुरुवात केल्याचे शिवाजीराव सावंत यांनी सांगितलं. सावंतांचे घर हे राज्यातील मोठे राजकीय घर असून ती फोडण्याची अकलूजच्या मोहिते पाटलांनी रामकाका मस्के आणि श्रीमंत कोकाटे यांना सुपारी दिली आहे. त्यातून ही फूट झाल्याचा आरोप शिवाजीराव सावंत यांनी केला आहे. शिवाजीराव सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे महाविकास आघाडीकडून पंढरपुरात निवडणूक लढवत आहेत.
माढ्यात रणजित शिंदेंना तर पंढरपूर मंगळवेढ्यात समाधान आवताडेंना मतदान करा : शिवाजी सावंत
दरम्यान, अनिल सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत माढ्यामध्ये बबनराव शिंदे यांना दिलेला शिवाजीराव सावंत यांचा पाठिंबा हा त्यांचा वैयक्तिक असल्याचे सांगितले होते. सर्व सावंत कुटुंब आम्ही एकत्र असून पंढरपुरात मी आणि माढ्यामध्ये अभिजीत पाटील यांच्या मागे सावंत कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याला आज शिवाजीराव सावंत यांनी उत्तर देताना कार्यकर्त्यांचा आग्रह होता म्हणून अपक्ष रणजित बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या समाधान आवताडे यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले आहे.
सावंत कुटुंबाची सोलापूर जिल्ह्यात मोठी ताकद
अनिल सावंत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आज त्यांचे चुलते शिवाजीराव सावंत यांनी थेट त्यांच्या विरोधी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याने सावंत कुटुंबातील फूट सर्वांसमोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात मोठी ताकद असणाऱ्या सावंत कुटुंबाच्या राजकारणाची सुरुवात शिवाजीराव सावंत यांनी केली होती. आजही सोलापूर जिल्ह्यात गावोगावी त्यांना मानणारा मोठा वर्ग असून 32 वर्ष शिवसेनेत काम करत त्यांनी सावंत कुटुंबाला राजकारणात आणले होते. यानंतर धाकटे बंधू आणि आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांना त्यांनी राज्य पातळीवर काम करण्यास पाठिंबा दिला होता. सोलापूर जिल्ह्याचे राजकारण स्वतः शिवाजीराव सावंत यांनी सांभाळले आहे.
अभिजीत पाटील आणि अनिल सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
आता अनिल सावंत हे माढ्यात उमेदवार असताना त्यांनी ज्या पद्धतीने काल पत्रकार परिषद घेतली त्यानंतर सावंन कुटुंबातील वाद समोर आला आहे. सावंतांचे घर फोडण्याचे काम मोहिते पाटील यांनी दोघांना सुपारी देऊन केल्याचा आरोप शिवाजीराव सावंत यांनी केला. माढ्यात अपक्ष उमेदवाराच्या तर पंढरपुरात महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिशी राहण्याचे आदेश शिवाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. यामुळं अभिजीत पाटील आणि अनिल सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: