अवनी वाघिणीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या डॉ. सरिता यांच्या घरात 8 सशस्त्र दरोडेखोर घुसले, पण... नेमकं काय घडलं?
Maharashtra Crime News: महाराष्ट्रात 13 जणांची हत्या करणाऱ्या अवनी नावाच्या सिंहिणीला वाचवण्यासाठी मोहीम राबवणाऱ्या डॉ. सरिता यांच्या घरात 8 सशस्त्र दरोडे घुसल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Maharashtra Crime News: मुंबईजवळच्या (Mumbai News) कर्जत (Karjat) येथील डॉ. सरिता सुब्रमण्यम (Dr. Sarita Subramaniam) यांच्या घरात आठ अज्ञात घुसल्याची घटना घडली आहे. पहाटे तीनच्या सुमारास हातात बंदूक, तलवार, हातोडा तसेच लोखंडी रॉड घेऊन हे अज्ञात डॉ. सरिता यांच्या घरात घुसल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 13 लोकांचा बळी घेणाऱ्या अवनी वाघिणीसाठी लढणाऱ्या सामाजित कार्यकर्त्या सरिता यांच्या घरात अज्ञात लोक घुसरल्यानं मोठी खळबळ माजली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही प्रकारची चोरी न करता किंवा कसलीही जीवितहानी न करता आठ अज्ञात इसम फक्त घराची फक्त पाहणी करून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईजवळच्या कर्जत परिसरात राहणाऱ्या वन्यजीव कार्यकर्त्या डॉ. सरिता सुब्रमण्यम यांच्या घरात शस्त्रांसह 8 अज्ञात व्यक्ति घुसल्या. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, या अज्ञात व्यक्तिंनी घरात कोणतीही चोरी केलेली नाही. ही संपूर्ण घटना बुधवारी पहाटे घडली. ही घटना घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सरिता यांच्या घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तींची ओळख पटलेली नाही. मात्र या व्यक्तींनी चांगले कपडे घातले होते. तसेच, आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी चेहऱ्यावर मास्क वापरला होता. तसेच त्यांच्या हातात काठ्या आणि तलवारीही होत्या.
या संदर्भात डॉ. सरिता आणि त्यांचे पती पीव्ही सुब्रमण्यम यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलिसांनी IPC कलम 398 आणि 548 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पी.व्ही. सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 ते 3.45 च्या दरम्यान हे दरोडेखोर घरात घुसले. डॉ. सरिता यांना जाग आली तेव्हा त्यांनी मुख्य दरवाजा उघडा असल्याचं पाहिलं. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला आणि ते पाहून त्यांना धक्काच बसला. अखेर शस्त्र घेऊन घरात घुसलेल्या व्यक्ती कोण, त्या काहीही न करता का निघून गेल्या, त्यांचा नेमका हेतू काय होता, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. तसेच, घरात घुसलेल्या व्यक्तींच्या हातात बंदूक, तलवारी, हातोडे, रॉड आणि क्लोरोफॉर्म स्प्रे दिसत होता. डॉ. सरिता यांनी असा प्रसंग पुन्हा होऊ नये, अशी भीतीही व्यक्त केली आहे. डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, या लोकांना माहीत होतं की, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तरीही ते कोणत्याही भीतीशिवाय तिथे होते. त्यांनी मास्क, हातमोजे आणि हुडीजही घातले होते.
पाहा व्हिडीओ : अवनी वाघिणीसाठी लढणाऱ्या डॉ. सरिता सुब्रमण्यम यांच्या घरात घुसखोरी
13 जणांना ठार मारल्याचा संशय असलेल्या अवनी (T1) नावाच्या सिंहिणीला वाचवण्यासाठी डॉ. सरिता या मोहिमेत आघाडीवर होत्या. जरी त्या सिंहिणीची 2018 मध्ये शिकार झाली होती. त्यानंतर डॉ. सरिता यांनी अवनीची हत्या बेकायदेशीर असल्याचं सांगत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.