(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई ते पुणे दरम्यान एक्सप्रेस गाड्यामध्ये तो करायचा मोबाईल चोरी, 4 वर्षांनी अडकला पोलिसांच्या जाळ्यात
kalyan crime News : मागील चार वर्षापासून एक चोरटामेल एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरी करत होता. इतकेच नाही तर तो चोरटा पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर चार वर्षांनंतर चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे.
kalyan crime News : मागील चार वर्षापासून एक चोरटामेल एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरी करत होता. इतकेच नाही तर तो चोरटा पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर चार वर्षांनंतर चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे. शुभम सानप असे या चोरटय़ाचे नाव आहे. त्या चोरट्याकडून पोलिसांनी 9 मोबाईल हस्तगत केले आहेत. शुभम मुंबई ते पुणे दरम्यान एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल लंपास करायचा. विशेषतः महिलांचे मोबाईल लंपास करायचा.
मेल एक्स्प्रेस, लोकल प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी रेल्वे पोलीस जंग जंग पछाडले आहे. मेल एक्सप्रेसमधून चोरी गेलेल्या एका मोबाईलचे ट्रेसिंग सुरु असताना हा मोबाईल अकोल्यातील एक व्यक्ती वापर असल्याची माहिती समोर आली. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अर्चना दुसाने आणि प्रवीण कांदे यांच्या पथकाने अकोल्यातून त्या व्यक्तिला ताब्यात घेतले. या व्यक्तीने शुभम् सानप या नावाच्या तरुणाकडून मोबाईल घेतल्याची माहिती दिली. पोलिसांचे पथक शुभम सानपच्या पुण्यातील पत्त्यावर पोहचले. मात्र शुभम पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधात होते.
पोलिसांना शुभम हा काही कामानिमित्त कल्याणला येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी शुभमला ताब्यात घेतले. याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल हस्तगत केले. पुढील तपासात आणखीन चार मोबाईल हस्तगत केले आहेत. शुभम यांच्याकडून एकूण 9 मोबाईल हस्तगत केले आहेत. धक्कादायक म्हणजे 2018 ते 2022 पर्यंत पुणे आणि मुंबई दरम्यान मेल एक्सप्रेस गाडय़ातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल शुभम चोरी करत होता. याचा कधीही सुगावा लागला नाही. विशेष करुन शुभम महिलांना लक्ष्य करायचा. आत्ता त्याचे बिंग फुटल्यावर त्याने आत्तार्पयत किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live