भररस्त्यात मेहुण्याचा तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला, प्रेम विवाह केल्याच्या रागातून हत्या
Hyderabad Killing: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका दलित तरुणाला मुस्लीम मुलीशी लग्न केल्यानंतर आपला जीव गमवावा लागला आहे.
Hyderabad Killing: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका दलित तरुणाला मुस्लीम मुलीशी लग्न केल्यानंतर आपला जीव गमवावा लागला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. विशेष म्हणजे ज्यावेळी हे सर्व घडत होत, त्यावेळी ही मुलगी देखील तेथे उपस्थित होती. तिने तेथे उपस्थित लोकांसमोर हात जोडत, रडत, ओरडत या तरुणाला वाचवण्याची अनेकवेळा विनवणी केली. मात्र तिच्या मदतीला कोणीही आलं नाही. या मारहाणीतच जागीच या तरुणाचा मृत्यू झाला आणि आरोपींनी तेथून पळ काढला. ही घटना हैदराबादममधील सरर्नगरमध्ये बुधवारी रात्री घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागराज (25) हा हैदराबादमधील बिल्लापुरम येथे राहत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याने 23 वर्षीय सय्यद सुलतानासोबत लग्न केले होते. दोघेही 11 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. या तरुणीने आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध जात नागराजशी लग्न केले होते. हा आंतरधर्मीय विवाह असल्याने दोन्ही कुटुंबीयांचा याला विरोध होता. अशातच बुधवारी रात्री ही तरुणी आपल्या नवऱ्यासह स्कूटरवर जात असताना तिच्या भावाने आणि काही नातेवाईकांनी त्यांच्यावर हल्ला केला.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती आणि तिचा नवरा स्कूटरवर जात असताना ते सिग्नलवर थांबले होते. तेव्हा तिच्या भावासह पाच लोक तिथे आले. या इसमांनी तिच्या नवऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या भावासोबत आलेल्या गुंडानी या तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करत चाकू हल्ला केला. यावेळी तरुणी त्यांचे पाय पकडत, हात जोडत आपल्या नवऱ्याला सोडण्याची विनवणी करत राहिली. मात्र या नराधमांनी त्याला सोडलं नाही. या इसमांनी केलेला हा हल्ला इतका भीषण होता की, जागीच नागराजचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.