दिवसा जिम ट्रेनर तर रात्री बंदुकीचा धाक दाखवून टाकायचे दरोडा, नऊ जणांना अटक
सकाळच्या सुमारास जिम ट्रेनरचे काम पाहणे व रात्रीच्या अंधारात बंदूक व चाकूचा धाक दाखवत गोरगरिबांना लुटणं असं या टोळीचा काम होते.
भिवंडी : भिवंडी शहरात चोरीच्या घटनेत वाढ होत असताना शांतीनगर पोलिसांनी एका टोळीला गजाआड केले आहे. सकाळी जिममध्ये ट्रेनरचे काम करायचे तर रात्रीच्या अंधारात बंदुकीचा धाक दाखवून करायचे दरोडा व घरफोडी सारखे गुन्हे या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केले आहे. त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गावठी कट्टा ,रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . तसेच दरोड्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात देखील कैद झाला आहे .
बंदुकीचा धाक दाखवत दरोड्याच्या घटनेत वाढ होत असताना पोलिसांसमोर या टोळीला पकडणे आवाहन होते. सकाळच्या सुमारास जिम ट्रेनरचे काम पाहणे व रात्रीच्या अंधारात बंदूक व चाकूचा धाक दाखवत गोरगरिबांना लुटणं असं या टोळीचा काम होते. जिमसाठी लागणाऱ्या गरजा तसेच मौजमजा करण्यासाठी ही टोळी चोरी करायची दरोडा घालायची. भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका खानावळ चालकाच्या कार्यालयात घुसून या टोळीने गावठी कट्ट्याचा धाक दाखवत फिर्यादीवर चाकूने वार करून जखमी करत त्यांच्या जवळील तीन मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात जबरी दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरोड्याचा गुन्ह्यातील सहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या कडून शांतीनगर पोलिसांनी तीन गुन्ह्यांची उकल केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील आरोपी हे जिम ट्रेनर असून दिवसा युवकांना व्यायामाचे प्रशिक्षण देऊन रात्री घरफोड्या व दरोडा करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .
त्या सोबत इतर पाच घरफोडीच्या गुन्ह्यां मध्ये अजून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये एक विधिसंघर्षग्रस्त बालक ,एक महिला व पुरुष यांचा समावेश आहे असे एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले आहे. त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा ,चाकू, 9 हजार रुपयांचे दोन मोबाईल, दोन हजार रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा त्या सोबत विविध पाच घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करीत 1 लाख 20 हजार रुपयांचे 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 95 रोख रक्कम 15 हजार रुपयांचे मोबाईल असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात बंदूक व चाकूचा धाक दाखवून दरोडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
संबंधित बातम्या :