भिवंडीत शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद
भिवंडीत शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
भिवंडी : काल्हेर येथील शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबार चुकवल्याने दीपक म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावल्या आहेत.
ठाण्याहून आपलं काम आटपून काल्हेरमध्ये परतल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या दुचाकीस्वारांनी म्हात्रे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले. वेळीच हा गोळीबार चुकवल्याने म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी बचावल्या गेल्यात, दीपक म्हात्रे आपल्या पत्नी बरोबर घराबाहेर गाडी पाहत होते आणि याच दरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या आधारे पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान दीपक म्हात्रे यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांनी सांगितले की ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. काल्हेर गावात भाजप व सेना ही चुरशीची लढत होत असते. मात्र, विश्वासघात करून भाजपने ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवला आहे. आता ही सत्ता जाईल या भीतीने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाजपनेच हा भ्याड हल्ला केल्याचा संशय म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी कलम 307, आर्म्स अॅक्टनुसार अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु असल्याने गोळीबार करण्यात आला आहे का? तसेच गोळीबाराची आणखी काही कारणे आहेत का? हल्लेखोर कोण होते? याचा संपूर्ण तपास पोलिस करत आहेत.
संबंधित बातमी :
नागपुरात गुंडाकडून शिक्षिकेला केसांना धरुन रस्त्यावर ओढत विनयभंग, विरोध करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण