ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी केअरटेकर नेमत असाल तर सावधान! जोगेश्वरी येथील घटनेने खळबळ
Crim News : मुंबईतील जोगेश्ववरीच्या मेघवाडी परिसरात घरातील नोकरानेच मालक आणि मालकाच्या पत्नीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं आहे.
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी नर्स केअरटेकरची (Care Taker ) नियुक्ती केली जाते. परंतु, तुम्ही पुरुष किंवा महिला नर्स केअरटेकरची नियुक्ती करण्याचा विचार करत असाल तर त्यांच्याबद्दल प्रथम संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच नियुक्ती करा. कारण बरेच लोक खासगी एजन्सीमधून अशा केअर टेकरची नियुक्ती करतात. परंतु, दोन दिवसांपूर्वी मुंबईतील जोगेश्वरी ( Mumbai Jogeshwari ) येथे घडलेल्या घटनेमुळे भाड्याने घेतलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतो का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
जोगेश्ववरीच्या मेघवाडी परिसरात घरातील नोकरानेच मालक आणि मालकाच्या पत्नीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. या हल्ल्यात मालकाचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सुधीर चिपळूणकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर सुप्रिया चिपळुणकर असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पप्पू कोळी असं हल्ला करणाऱ्या संशयिताचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणकर यांची मुलं परदेशात राहतात. त्यामुळे या जोडप्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी ऑनलाइन शोधलेला खासगी एजन्सीमधून पप्पू कोळी याला केअर टेकर म्हणून नेमलं होतं. परंतु, त्याने चोरीच्या उद्देशाने चिपळूणकर दाम्पत्यावर हल्ला केला. पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्याला ज्या एजन्सीमार्फत नियुक्त केले गेले होते त्यांच्याकडून गुन्हेगारी इतिहासाची माहिती का लपवून ठेवली गेली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केअर टेकरची नियुक्ती करण्यापूर्वी एजन्सी आणि कामावर घेत असलेल्या कर्मचाऱ्याकडून पोलिस एनओसी मागतात. बर्याच कंपन्या कर्मचार्याला पोलिस पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यास सांगतात, ज्यात व्यक्तीच्या गुन्हेगारी रेकॉर्डचे तपशील उघड होते. त्यामुळे या प्रकरणात आरोपी कोळीला खासगी एजन्सींनी कामावर ठेवले होते त्यावेळी त्यांनी पोलिस पडताळणी प्रमाणपत्र घेण्यास सांगितले असते तर एवढा मोठा प्रकार घडला नसता, असे पोलिसांचे मत आहे. संबंधित खासगी कंपनीने प्रमाणपत्र घेतले असते तर आरोपी कोळी याचा गुन्हेगारी रेकॉर्ड अगोदर उघड झाला असता. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावर ठेवण्यापूर्वी त्याचे पोलिस पडताळणी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर सोसायट्यांनी काळजी घेण्यास सुरूवात केली आहे. "सोसायटीने आता इमारतीत येणाऱ्या सर्व घरकाम आणि कामगार लोकांची माहिती एका पुस्तकात लिहणं सुरू केलं आहे, अशी माहिती सुधाकर गवस यांनी दिली.
चिपळूणकर यांची तब्येत बरी नसल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी खासगी एजन्सीमार्फत केअरटेकर ठेवल्याचा दावा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी केला आहे. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीला नोकरीवर ठेवले असेल तर पोलिसांनी एजन्सींवरही कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात संबंधित एजन्सी अशी जबाबदारी देण्यापूर्वी गुन्हेगारी रेकॉर्ड तपासतील, अशी माहणी नातेवाईकांनी केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "कोळी याला कामावर ठेवणाऱ्या खासगी एजन्सींना पोलिसांनी मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. आता एजन्सींवरही गुन्हा नोंदवून त्यांना सहआरोपी करणार की चौकशी करून सोडून देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.