(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
Kanpur News : गर्लफ्रेंडसोबत लग्नासाठी घरचे तयार झाले, पण लग्नाच्या दिवशीच नवरदेव दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
कानपूर, उत्तर प्रदेश : बॉलिवूड चित्रपटांमध्ये किंवा खऱ्या आयुष्यात तुम्ही आतापर्यंत नवरी पळून गेल्याच्या बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील, पण या उलट एक घटना घडली आहे. लग्नाच्या भरमंडपात नवरी (Bride) वाट पाहत असताना नवरदेवचं (Groom) पळून गेला. विशेष म्हणजे हा प्रेमविवाह होता आणि त्यासाठी दोन्ही कुटुंबे तयार झाली होती. मात्र अचानक नवरदेव दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेला, त्यानंतर पीडितेने आरोपी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) ही घटना घडली आहे.
एका लग्नाची दुसरी गोष्ट
कानपूरमध्ये एका प्रेमी जोडप्याने घरच्यांच्या परवानगीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाची सर्व तयारी झाली. 23 एप्रिलला लग्न होणार होते. लग्नाचा दिवस उजाडला, नवरी तयार होऊन मंडपात बसली खरी, पण नवरदेवचं पळून गेला. प्रेयसीसोबत लग्नाच्या दिवशी नवरदेव दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत फरार झाला. नवरदेव आणि नवरी यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेम संबंध होते. या दोघांनी घरच्यांची समजूत काढत लग्नासाठी तयार केलं. पण, लग्नाच्या दिवशी नवरदेव पहिल्या प्रेयसीला ताटकळत ठेवत अचानक दुसऱ्या प्रेयसीसोबत फरार झाला.
नवरदेव दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत फरार
ही लग्नाची अधुरी कहाणी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. प्रेमविवाहासाठी दोन्ही कुटुंबे तयार होती. मात्र अचानक नवरदेव प्रेमिका नवरीला ताटकळत ठेवणं दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेला. नवरदेव एका शाळेत शिक्षक असून त्याचे अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानीवर प्रेम जडले. कुटुंबीयांनी आधीच त्याच्याच मर्जीनेच लग्न ठरवलं होतं, पण दुसऱ्या मुलीवर प्रेम जडल्याने त्याला पहिल्या प्रेयसीसोबत लग्न करायचं नव्हतं त्यामुळे त्याने ऐन लग्नाच्या दिवशी दुसऱ्या प्रेयसीसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.
वधूसह वऱ्हाडी वराची वाट पाहत होते
23 एप्रिलला दोघेही लग्न करणार होते. नटलेल्या वधूसह वऱ्हाडी मंडळी वराची वाट पाहत होते. पण नंतर त्यांना माहिती मिळाली की नवरदेव दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला आहे. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. पीडित कुटुंबाने सांगितले की, त्यांनी लग्नाची तयारी पूर्ण केली असून गेस्ट हाऊसपासून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यांनी रात्रभर नवरदेवाची वरात येण्याची वाट पाहिली पण नवरा मुलगा दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला.
प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु
कानपूर दक्षिण डीसीपी रवींद्र कुमार यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, सध्या हनुमंत विहार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, नवरदेव त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेला आहे. या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.