Mumbai Crime: मुंबईत प्रियकरानेच विवाहीत प्रेयसीला संपवलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Mumbai Crime News: मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेची हत्या करुन आरोपी पसार झाला होता. मात्र पोलिसांनी आता आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Mumbai Crime: मुंबईतील (Mumbai) साकीनाका परिसरात एका विवाहित महिलेची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली, आरोपीने मात्र हत्या करुन घटनास्थळावरुन पळ काढला. दीपक बोरसे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीचे विवाहीत महिलेसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे सध्या साकीनाका परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला आणि त्याला मुंबई मधूनच अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या ट्विटमधून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीनाक्यातील खैराणी रोड येथे ही घटना घडली आहे. आरोपी हा मृत महिलेचा प्रियकर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोघे रिक्षातून जात असतांना काही कारणांवरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने रिक्षामध्येच तिची हत्या केली आणि नंतर रिक्षातून पळ काढला. सध्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मृत महिला विवाहीत असून तिला एक मुलगा देखील आहे. सध्या, तिचे तिच्या पतीसोबत जुळत नसल्याने ती तिच्या माहेरी आईसोबत राहत होती. दीपक हा हत्येच्या इराद्यानेच बसला होता. त्याने त्याच्याकडील हत्याराने तिचा गळा चिरला आणि स्वतः देखील जखमी झाला.
ट्वीटमध्ये काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमधून केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, 'साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. ही अतिशय संतापजनक घटना आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरीक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तपासयंत्रणा सक्रिय करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे.'
साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. हि अतिशय संतापजनक घटना आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरीक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून…
— Supriya Sule (@supriya_sule) June 19, 2023
मुंबईत महिलांच्या हत्येचं सत्र
मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये महिलांच्या हत्येचं सत्र सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मायानगरीतील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील एका शासकीय वसतीगृहातील मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने देखील ट्रेनखाली उडी मारुन जीव दिला. दरम्यान मुंबईतील मिरारोड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची निघृण हत्या करण्यात करुन तिच्या शरीराचे तुकडे करुन विल्हेवाट लावण्यात आली होती. मनोज साने असं आरोपीचं नाव असून तर मृत महिलेचं नाव सरस्वती वैद्य असं होतं. त्यानंतर पोलिसांनी सानेला अटक देखील केली.