Beed Crime : वाल्मिक कराडला सोयी सुविधा, बाहेरच्या लोकांना भेटायला मुभा; संतोष देशमुखांच्या भावालाही अरेरावी ; एपीआय दराडेंवर धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप
Beed Crime : वाल्मिक कराडला सोयी सुविधा आणि बाहेरच्या लोकांना भेटायला मुभा दिली जात असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलाय.
Beed Crime : संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले असून या पत्रात तक्रारींचा पाढा वाचण्यात आलाय. धनंजय देशमुख यांना थेट पोलीस ठाण्यातच अरेरावी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. बाहेरील लोक थेट वाल्मिक कराड असलेल्या पोलीस कोठडीपर्यंत जात असल्याचा आणि वाल्मिक कराडला मिळत असलेल्या सुविधा व यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही धनंजय देशमुखांनी केलाय. एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केलीय.
धनंजय देशमुखांनी तक्रारीत काय काय म्हटलंय?
वरील विषयान्वये तक्रार करणार मी नामे धनंजय पंडितराव देशमुख असून माझे राख्खे बंधू संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून करण्यात आले. या हत्ये संदर्भात आज २४ दिवस उलटले असून या कामी पोलीस स्टेशन शहर बीड येथे गेलो असता, खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी कोरेगाव माजी सरपंच पती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले. मला विचारले तू इथे काय करायला, सीआयडीवाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेल्या कोठडी कडे गेले. दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हटले तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात. आम्हाला म्हटला आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो दाखवला व आरे रावी केले आणि संताप जनक माझ्याशी वागला. आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्याने हुजत घातली व आपण सीआयडी सोबत आलो आहोत असे सांगितले. येथील दंगल पथकातील कर्मचारी यांना आपण सीआयडी चा वाहन चालक असल्याचे म्हटला रेडेकर यांच्याशी हुजत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असे उलट रेडेकर यांनाच बोलले व तांदळे यांना बाजूच्या रूम मध्ये बसवून नंतर सोडून दिले. मेहरबान साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे कि ज्या ठिकाणी आरोपी आहेत अश्या ठिकाणी असे लोक येतात कसे, खुन करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशती खाली घेत होता अशी माझी तक्रार आहे. अश्या लोकांच्या थेट कोठडी पर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे. या संदर्भाने आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मी करत आहे. यावेळी एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले, दराडे आणि तांदळे यांचे संगनमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर ? माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुणी हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही. यासाठी बालाजी तांदळे व एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मिक कराड यांच्या पासून दूर ठेवावे अशी मी मागणी करत आहे. वरील घटना घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबुराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी नितीन जाधव हे होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या