Beed Crime : एक कोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी पत्नीचा कट, पतीची हत्या करण्यासाठी दहा लाख रुपयांची सुपारी!
Beed crime : पतीचा एक कोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी पत्नीने कट रचला. पतीला मारण्यासाठी तब्बल दहा कोटी रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी महिला आणि मारेकऱ्यासह तिघांना अटक केली आहे.
बीड : बीडमध्ये मसोबा फाट्याजवळ आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली हा खून असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या खुनाचा उलगड झाला असून मृताच्या पत्नीनेच त्याला मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिली होती. नवऱ्याचा एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी त्याची हत्या करण्यासाठी पत्नीने सुपारी दिली होती.
काही दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण शिवारात मसोबा फाट्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी हा मृतदेह नेमका कोणाचा आणि या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये या व्यक्तीचा मृत्यू अपघातामध्ये झाला असल्याचा संशय पोलिसांना होता. चौकशी केल्यानंतर बीड शहरातील मंचक गोविंद पवार या व्यक्तीचा मृतदेह असल्याचे पोलिसांना समजलं.
या प्रकरणी मंचक यांचा मुलगा आणि पत्नी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पोलिसांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय अधिक बळावला. मंचक यांचा अपघात नसून त्यांचा घातपात केल्याचं पोलिसांना वाटू लागलं आणि सबळ पुरावे नसतानाही पोलिसांनी मंचक पवार यांच्या मृत्यूचे गूढ उलगडायला सुरुवात केली. पोलिसांचं गोपनीय पथक याबद्दल माहिती घेत असतानाच त्यांनी बीड तालुक्यातीलच काकडीचा इथल्या श्रीकृष्ण सखाराम बागलाने याला ताब्यात घेतलं.
श्रीकृष्ण बागलाने याच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता सुरुवातीला त्यानेही पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. मृत मंचर पवार यांची पत्नी गंगाबाई पवार हिने आपल्या पतीला मारण्यासाठी दहा लाख रुपयांची सुपारी माझ्यासह इतर तीन जणांना दिली होती, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी श्रीकृष्ण बागलाने याच्यासह सोमेश्वर वैजनाथ गव्हाणे, गंगाबाई मंचक पवार यांना बेड्या ठोकल्या आहेत तर दोन अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
असा केला खून!
मृत मंचक पवार यांच्या नावाने एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी होती. ती आपल्याला मिळावी म्हणून गंगाबाई पवार हिने पती मंचक यांची श्रीकृष्ण बागलाने याला दहा लाख रुपयाला सुपारी दिली. ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण बागलाने याने मंचक पवार याला दिवसभर आपल्यासोबत दारु पाजली. त्यानंतर शहरातीलच एका अज्ञात रस्त्यावर त्याच्या डोक्यात वार करुन खून केला. त्यानंतर त्याला एका स्कूटरवर बसवून मसोबा फाट्याजवळ एका टेम्पोने त्याला धडक दिली. धडकेत मंचक पवार यांचा मृत्यू झाल्याचं भासवलं आणि घटनास्थळाहून श्रीकृष्ण बागलानेसह त्याचे दोन साथीदार पसार झाले.